नवोदित अभिनेत्री शर्वरी वाघ 'बंटी और बबली 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बोल्ड, बुद्धीमान, टेक्नोसॅव्ही, नव्या बबलीच्या भूमिकेतून बॉलिवुडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक अभिनयाचे कौतुक करत आहेत, शिवाय त्यात वेगवेगळ्या रूपात तिला पाहून आश्चर्यचकितही झाले आहेत. या सिनेमात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी साकारत असलेल्या बंटीच्या मदतीने एका मोठ्या चोरीच्या प्रसंगी आपल्याला मातृभाषेत- मराठीत बोलायला मिळणार असल्याचं कळल्यावर शर्वरीला खूपच आनंद झाला होता.
शर्वरी म्हणाली, ‘बंटी और बबली 2 हा सिनेमा माझ्यासाठी विविध कारणांनी खास आहे. या सिनेमातून मी पर्दापण करत असून हिंदी सिनेमाच्या हिरोइनच्या रूपात हे पर्दापण करायची संधी मिळणं हे माझं भाग्यच आहे. या सिनेमात मला सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाले तसेच त्यांच्याकडून खूप काही शिकायलाही मिळाले.’
ती पुढे म्हणाली, ‘सिनेमाच्या पूर्ण शूटिंगचा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता आणि त्यातही एका चोरीच्या प्रसंगात मला माझी मातृभाषा- मराठी बोलायची संधी मिळाली. 'बंटी और बबली 2' सिनेमात दोन वेगळ्या पिढ्यांच्या चोरांच्या जोडीचा धमाकेदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. चोरांनी केलेल्या फसवणुकीवर आधारित हा सिनेमा असल्यामुळे चोरांच्या दोन्ही जोड्या जबरदस्त आणि जबरदस्त वेषांतर करताना दिसतील.’ शर्वरी पुढे म्हणाली, ‘मी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका केली, जी मराठी असते. मी काही मराठी संवादांची भर घातली आहे. अर्थातच मी या प्रसंगाचे शूटिंग करताना खूप उत्सुक होते.’बंटी और बबली 2' सिनेमात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी मूळच्या बंटी-बबलीच्या भूमिकेत दिसतील. या विनोदी सिनेमात चोऱ्यांच्या दोन वेगळ्या पिढ्यांच्या जोड्या एकमेकांविरूद्ध टक्कर देत कोणती जोडी जास्त चांगली आहे हे सिद्ध करताना दिसतील.यश राज फिल्म्सचा हा धमाल कौटुंबिक मनोरंजन सिनेमा बंटी और बबली 2, 19 नोव्हेंबर 2021 प्रदर्शित होणार असून वरुण व्हि. शर्मा यांनी दिग्दर्शिन केले आहे. शर्मा यांनी यापूर्वी वायआरएफच्या 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' अशा मोठ्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.