सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांची लाडकी अभिनेत्री. मालिका, चित्रपट, वेब स्टोरीज अशा सगळ्या माध्यमांत काम करणाऱ्या सायलीचे असंख्य चाहते आहेत. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून सायली घराघरात पोहोचली. लवकरच तिचा ‘हर हर महादेव’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती थोरल्या राणीसाहेब म्हणजेच सईबाई भोसले यांची भूमिका वठवणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायलीने नुकतीच ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus ) या शोमध्ये हजेरी लावली आणि यानिमित्ताने एक ना अनेक खुलासे केलेत. तिच्यासोबत अभिनेता शरद केळकर हा सुद्धा शोमध्ये दिसला.‘बस बाई बस’ चा होस्ट सुबोध भावेचे प्रश्न आणि सायलीची धम्माल उत्तरं असा हा ‘सिलसिला’ चांगलाच रंगला. सायलीने अनेक गमतीशीर किस्से सांगितले, अनेक मजेशीर खुलासे केलेत. यावेळी सायलीला प्रपोज करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने कॉलेजमधील एक गमतीशीर किस्सा ऐकवला.
मी मुलांना प्रपोज केलं...होय, ऐकून विश्वास बसणार नाही पण कॉलेजमध्ये असताना सायलीनं अनेक मुलांना प्रपोज केलं होतं. याबद्दल ती म्हणाली, ‘मी बरीच स्पष्टवक्ती आहे. मनाला पटेल ते मी पटकन बोलते. मी लाजत नाही म्हणुनच तर मी कॉलेजमध्ये असताना मुलांना स्वत:हून प्रपोज केलं होतं. म्हणजे खूप मुलं नाही पण 2 ते 3 जणांना. पण ते सुद्धा तेव्हा मला नाहीच म्हणाले. त्यांनी मला तेव्हा नकार दिला. आता जर ते टीव्ही पाहत असतील तर त्यांना आठवेल. हा एपिसोड पाहून त्यांना आठवेल ही तीच आहे..., असं सायलीने यावेळी सांगितलं. यावरून सुबोध आणि शरद केळकरने तिची चांगलीच मजा घेतली. ‘त्यांनी तुला काय म्हणत नकार दिला की जा आणि थोडी मोठी होऊन ये?’, असं सुबोध म्हणाला. यावर शरद केळकरनेही सायलीची मस्करी केली. ‘ती आताही शाळेतच आहे पण तुला नकार देणारी मुलं किती कमनशिबी असतील.....,’ असं शरद म्हणाला. यावर सगळेच हसू लागलेत.
त्याने माझा हात हातात घेतला आणि....यावेळी सायलीने शाहरूख खानसोबत भेटीचा एक किस्साही सांगितला. एका प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, ‘मी माझ्या एका मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न आणि रिसेप्शन झाल्यानंतर मी निघण्याच्या तयारीत होते. पण हॉटेलमधील सगळ्या लिफ्ट बंद करून ठेवल्या होत्या. त्यामुळे मी तिथेच अडकून पडले होते. अचानक एक व्यक्ती माझ्या डोळ्यांसमोरून आत गेली. तो शाहरूख खान होता. मी वेड्यासारखी बघत उभे होते. माझ्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटून शाहरूख बाहेर आला. माझ्या मित्राने त्याला माझी ओळख करून दिली. त्यानंतर शाहरूख माझा हात हातात घेऊन बोलत होता. मी नुसतेच त्याच्याकडे पाहत होते. तो काय बोलला, त्यातलं एक अक्षरही आठवत नाही. पण कोणीतरी ते सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले. ते सगळे फोटो मात्र माझ्याकडे आहेत...’‘ हर हर महादेव’ चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आहे तर सायली महाराणी सईबाई भोसले यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर येत्या 25 आॅक्टोबरला प्रदर्शित होत आहे.