जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झालीत. याचदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणजेएनयूमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचली आणि सगळीकडे खळबळ माजली. दीपिकाच्या जेएनयू भेटीनंतर अनेकांनी तिच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. सोशल मीडियावर दीपिकावर नको इतकी टीका झाली. साहजिकच ‘छपाक’ला या टीकेचा फटका बसला. आता दीपिकाच्या जाहिरातींनाही याचा फटका बसतोय. होय, ज्या जाहिरातींमध्ये दीपिका आहे, त्या जाहिराती दाखवण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.
दीपिका ही अनेक बड्या ब्रँडचा चेहरा आहे. ब्रिटानिया गुडडे, लॉरिलयल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स आणि अॅक्सिस बँकेसह 23 विविध ब्रँडसाठी ती जाहीराती करते. या जाहिरातीतून ती सुमारे 103 कोटींची कमाई करते. एका चित्रपटासाठी दीपिका 10 कोटी रूपये घेते तर एका जाहिरातीसाठी 8 कोटी. पण जेएनयूच्या संपूर्ण एपिसोडमुळे काही ब्रँड्सनी दीपिका असलेल्या जाहिरातींचे प्रमाण घटवले आहे. अर्थात अद्याप कुठल्याही ब्रँडने तिच्यासोबतचा जाहिरातींचा करार रद्द करण्याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नाही. एका कंपनीच्या एक्झिक्युटीवने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दीपिका असलेल्या जाहीरातीला दोन आठवड्यासाठी थांबवण्याचे आम्हाला एका ब्रँडने सांगितले आहे. तोपर्यंत वाद निवळेल अशी आशा त्यांना आहे, असे या एक्झिक्सुटीवने सांगितले.
येत्या काळात बदलणार करारातील अटी व नियममोठमोठे ब्रँड कुठल्याही वादात पडू इच्छित नाही. त्याचमुळे येत्या येत्या काळात जाहिरातींच्या करारामध्ये काही नियम किंवा अटी वाढवल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. जाहिरातीत काम करणा-या सेलिब्रेटींची राजकीय भूमिका वा प्रशासनाचा रोष ओढवेल अशा कृतीबद्दलचे काही नियम जाहिरातींच्या करारामध्ये घालून देण्यात येणार असल्याचे कळतेय. जेणेकरून सेलिब्रिटींच्या राजकीय भूमिकेचा वा कृतीचा फटका संबंधित ब्रँडला बसणार नाही.
‘छपाक’ प्रदर्शित होण्यापूर्वी तीन दिवस आधी दीपिका जेएनयू कँपसमध्ये गेली होती. गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयषी घोष हिच्या शेजारी उभा असलेला दीपिकाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर दीपिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.