Join us  

विशेष लेख : ...पण मधल्या स्त्रियांचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 7:44 AM

आज महिला परस्परभिन्न दोन टोकांवर उभ्या असल्याचं मला जाणवतंय. एका टोकावर उभ्या असलेल्या स्त्रियांना स्वातंत्र्य हवं आहे.....

हेमांगी कवी,अभिनेत्री आज महिला परस्परभिन्न दोन टोकांवर उभ्या असल्याचं मला जाणवतंय. एका टोकावर उभ्या असलेल्या स्त्रियांना स्वातंत्र्य हवं आहे. स्वत:चं मत तयार करायचं आहे. यांना स्वत:च्या टर्म्स ॲण्ड कंडिशन्सवर जगायचं आहे. दुसऱ्या टोकावरील स्त्रिया पुरुषप्रधान संस्कृतीतील परंपरा आंधळेपणाने फॉलो करण्याच्या विचारांच्या आहेत. हीच आपली संस्कृती असल्याचं त्यांना वाटत आहे. अशा दोन टोकांवरच्या म्हणजेच दोन ध्रुवांवरच्या स्त्रिया आजच्या युगात मला सोशल मीडिया तसंच एकूण आजूबाजूच्या वातावरणातून जाणवतात. महिलांमध्येही साऊथ आणि नॉर्थ पोल तयार झाले आहेत; पण मधल्या स्त्रियांचं काय? पुरुषांनी आखून दिलेली संस्कृती-परंपराही जपायची आहे; पण मी स्वतंत्र असल्याचंही बोलायचं आहे. ही दिशा स्त्रियांना नक्की कुठे नेणारी आहे?

स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांचं प्रमाण वाढतंय, की संस्कृती-परंपरा जतन करणाऱ्यांचं, काहीशा मागासलेल्या विचारांच्या स्त्रियांचा वर्ग वाढतोय, की दोन विचारांच्यामध्ये लटकलेल्यांचं प्रमाण वाढतंय... या वातावरणात मीसुद्धा चाचपडत आहे. कपड्यांपासून विचारांपर्यंत फ्री स्टाइल जगायला आवडणाऱ्या स्त्रियांमध्ये मी जास्त मोडते; पण कधी-कधी असं काही एक्स्प्रेस केलं की सोशल मीडियाद्वारे जो वैचारिक हल्ला होतो तो विचार करायला भाग पाडतो. मला नेहमी असं वाटतं की, सावित्रीबाईंनी आम्हाला याच गोष्टींसाठी शिकवलं का... नाही तर शिकवायचीच गरज नव्हती. मग चूल आणि मूलच योग्य होतं की काय? कारण मुलींना शिकवायचंही आहे आणि त्यांना त्यांच्या मर्जीनुसार जगूही द्यायचं नाही. तिला बंधनं घातलेली आहेत. पुरुषांना मात्र बंधनं नाहीत. हा विचार जोपर्यंत तडीपार होत नाही, तोपर्यंत समानता वगैरे फक्त बोलाच्याच गोष्टी ठरतात. आजही आपण मुलगा-मुलगीमध्ये फरक करतोय.

स्त्रियांच्या वागण्याला धाडसाचं रूप देऊन पुन्हा आपण काही तरी शुगर कोटेड बोलतो. घराबाहेर मुलीसोबत काही वाईट घडलं की तिलाच दोष देतो; पण मुलासोबत घडलं तर मुलाला बोलत नाही. आपण नकळत मुलांची जबाबदारी घेतो; पण आजही मुलींची जबाबदारी घेत नाही. कोणत्याही मुलीकडे सन्मानाने बघण्याची दृष्टी तसेच संस्कार जेव्हा प्रत्येक आई-वडील मुलावर करतील तेव्हा घराबाहेर पडलेली कोणतीही मुलगी असुरक्षित राहणार नाही. ‘लोग क्या कहेंगे...’ या विचारसरणीचे लोक मुलांसाठी वेगळे आणि मुलीसाठी वेगळे असतात.

लोक ट्रोल करतात म्हणून मी कधीच बॅकफूटवर जाणार नाही. उलट त्यामुळे काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. ज्या दिवशी हल्ला होतो, त्या दिवशी दोन-तीन तासांसाठी होणाऱ्या विरोधाचा विचार करते. त्यात झालेल्या हल्ल्यात काही तथ्य आहे का, ते तपासते. त्यानंतर आपण जे बोललो ते योग्य असल्याचं जाणवतं. कदाचित पुढील पाच-सहा वर्षांमध्ये क्लॅरिटी आल्यावर असा विचारही करणार नाही. 

मलाही ऐन तारुण्यात वूमन्स डेचं अप्रूप आणि हुरूप होता; पण आता महिला दिन का साजरा करायचा? असं वाटतं. दिवस साजरा करताना कोणी तरी महिलांपेक्षा सुपेरियर आहे आणि कोणी तरी ३६४ दिवस राज्य करणार आहे, असं वाटतं. ३६५ दिवस आपण हा दिवस साजरा केला नाही तरी जगू तरी शकतोच ना... ८ मार्चला महिलांसाठी चांगलं बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी अत्याचार करायचा, त्यांना घरी बसवायचं. हेच करायचं का... आजही मुली सोलो ट्रीप करू शकत नाहीत असं का? पुरुष चांगला-वाईट कसाही वागला तरी तो कॉन्सिक्वेन्सेसचा विचार करत नाही. स्त्रियांचं मात्र तसं नाही. 

टॅग्स :हेमांगी कवीमहिला