२१ फेब्रुवारी रोजी 'मेरे हसबंड की बीवी' (mere husband ki biwi) चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमाच्या मेकर्सने सिनेप्रेमींसाठी एक खास ऑफर आणली आहे. उद्या 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमा रिलीज होणार आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना एकावर एक तिकीट फ्री मिळणार आहे. जाणून घ्या.
'मेरे हसबंड की बीवी'साठी खास ऑफर
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंग यांची भूमिका असलेल्या 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमाचं अॅडव्हान्स बुकींग सुरु झालंय. यासाठी प्रेक्षकांना १ तिकीट खरेदी केल्यावर १ तिकीट मोफत मिळणार आहे. ही ऑफर सिनेमाच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच फक्त शुक्रवारी लागू आहे. एकूणच सध्या चर्चेत असलेला 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमा सुपरहिट व्हावा म्हणून प्रेक्षकांना ही खास ऑफर मेकर्सकडून देण्यात आली आहे.
'मेरे हसबंड की बीवी' सिनेमाविषयी
मुदस्सर अझीझ दिग्दर्शित 'मेरे हसबंड की बीवी'मध्ये हर्ष गुर्जर, शक्ती कपूर, दिनो मोरिया आणि आदित्य सील यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वाशु भगनानी आणि पूजा फिल्म्स प्रस्तुत आणि वाशु भगनानी, जॅकी भगनानी आणि दीप्ती भगनानी निर्मित हा विनोदी चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सिनेमातील गाणी, टीझर, ट्रेलरची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे.