Join us  

‘पिंजरा’चे दर्शन मोठ्या पडद्यावर

By admin | Published: March 13, 2016 2:14 AM

नका सोडून जाऊ रंगमहाल कशी नशीबानं थट्टा आज मांडली यांसारख्या सदाबहार गीतांनी ‘पिंंजरा’ चित्रपटाच्या शिरपेचात मोरपंख रोवला गेला अन् तो सिनेमा सुवर्णाक्षरांनी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर होऊन गेला.

आली ठुमकत नार लचकत... छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... दिसला गं बाई दिसला... तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल... कशी नशीबानं थट्टा आज मांडली... यांसारख्या सदाबहार गीतांनी ‘पिंंजरा’ चित्रपटाच्या शिरपेचात मोरपंख रोवला गेला अन् तो सिनेमा सुवर्णाक्षरांनी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर होऊन गेला. तत्त्वनिष्ठ व ब्रह्मचारी शिक्षकाची केवळ एका नर्तकीच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या आत्मिक व सामाजिक अध:पतनाची ही कथा पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. श्रीराम लागू यांनी त्यांच्या कसदार अभिनयशैलीच्या जोरावर जो मास्तर ‘पिंजरा’मध्ये साकारलाय त्याला कोणाचीच तोड नाही, तर संध्या यांनी केलेली नर्तकीची भूमिका आणि त्यांच्या नृत्याच्या अदांनी तर प्रेक्षकांना घायाळ केले होते. आजही या सिनेमाची जादू कायम असून तब्बल ४४ वर्षांनंतर पिंजरा हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या अंदाजात, डिजिटलाईज होऊन ७० एमएमच्या पडद्यावर पुन्हा एकदा रसिकांना पाहता येणार आहे.पिंजराला नवे रूप देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वितरक पुरुषोत्तम लढ्ढा प्रयत्न करीत होते. चंद्रसेना पाटील आणि पुरुषोत्तम लढ्ढा यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रॉडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने वितरणाचे हक्क घेतले. प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करीत तिचे २ के स्कॅनिंग करीत नवी अद्ययावत प्रिंट तयार केली. हँड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, २ के स्कॅनिंग, आॅडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, आॅडिओ ....रिस्ट्रोरेशन या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे. पिंजरा नव्या रूपात घेऊन येताना कोणते आव्हान अन् अडचणींना सामोरे जावे लागले, यासंदर्भात पुरुषोत्तम लढ्ढा यांनी त्यांचे अनुभव सांगितले. माझ्या आयुष्याची, करिअरची सुरुवात मी १९७२ मध्ये पिंजरा या चित्रपटाच्या वितरणापासूनच केली. हा चित्रपट करण्याचे भाग्य आपल्याला मिळो असे नेहमी वाटायचे. उत्तम लावणीप्रधान चित्रपटाला कधीच मरण नसते, ती कलाकृती अभिजात ठरते. त्यासाठी मी सतत किरण शांताराम यांच्याकडे जायचो आणि मला पिंजरा पुन्हा नव्या स्वरुपात करायचाय, असे त्यांना सांगायचो. परंतु संध्यातार्इंची याला परवानगी नव्हती व खुद्द व्ही. शांताराम यांना त्यांचा चित्रपट दुसऱ्या व्यक्तीला कधी द्यायचा नव्हता, अशी कारणे मला मिळायची. एक दिवस किरण शांताराम यांनी मला चित्रपटासाठी परवानगी दिली अन् जणू काही व्ही. शांताराम यांनीच त्यांना असे करायला सांगितले की काय, असे वाटले.किरण शांताराम म्हणाले, ‘‘पिंजरा चित्रपट ही एक अजरामर कलाकृती आहे. आजही पिंजरातील संगीत, गाणी गाजत आहेत. कोणताही कार्यक्रम असो या सिनेमातील गाणी गायिली जातात अन् प्रेक्षकांचा वन्स मोअरदेखील या गीतांना मिळतो. पिंजराची मोहिनी आजही कायम असल्याने तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट नव्या रूपात येऊन आजच्या तरुण पिढीने तो पाहावा, यासाठी आम्ही तो नव्याने तयार केला. चित्रपटाला जेव्हा १९७३ मध्ये नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाले तेव्हाच व्ही. शांताराम यांनी ठरविले होते. हा चित्रपट इतर भाषांमध्ये करायचा. तशी स्क्रीप्टदेखील लिहिली गेली. आता त्याच स्क्रीप्टचा संदर्भ घेऊन इंग्रजी सबटायटलमध्ये चित्रपट अनुभवता येईल.’’- प्रियांका लोंढे> ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची कन्या प्रियदर्शनी हीदेखील पुष्पक-प्रियदर्शनी या प्रॉडक्शन कंपनीद्वारे या चित्रपटाशी जोडली गेलेली आहे. तिने रज्जो या हिंदी सिनेमासाठी प्रॉडक्शनचे काम पाहिले होते. ती म्हणाली, पिंजरा हा सिनेमा करिअरच्या सुरुवातीला मिळणे, यावर माझा विश्वासच बसत नाही. हा सिनेमा मला खरंच गिफ्ट मिळाला आहे. आम्ही पिंजराला नाही तर पिंजरा सिनेमाने आम्हाला निवडले आहे.>पिंजरा हा युगप्रवर्तक सिनेमा आहे, असे विश्वास पाटील सांगतात. या सिनेमासोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत, असे सांगताना ते म्हणतात, ‘‘मी पाचवीमध्ये असताना हा सिनेमा पाहिला होता. जगदीश खेबुडकर हे तेव्हा माझे शिक्षक होते. या सर्वांशी माझे जवळचे नाते होते. हा सिनेमा मी १०० पेक्षा जास्त वेळा पाहिला असेल. इंटरवलपर्यंत सिनेमा पाहावा ते जगदीश खेबुडकर यांच्या शब्दांसाठी आणि इंटरवलनंतर तो पाहावा व्ही. शांताराम यांच्या कामासाठी आणि लागूंच्या अदाकारीसाठी.’’> पिंजरामध्ये मास्तरची दमदार भूमिका साकारणारे श्रीराम लागू या चित्रपटाच्या आठवणींमध्ये पार हरवून गेले होते. पिंजरा या नावालाच माझा विरोध होता. शूटिंग सुरू झाल्यानंतर समजले, की हा पिंजरा काही लोखंडाचा नाही, तर माणसाच्या जाणिवेचा आहे अन् यात माणूस अगदी उत्कृष्टपणे सापडू शकतो. व्ही. शांताराम यांनी माझ्यातील नट जागा केला आणि माझ्याकडून उत्तम काम करून घेतलं. या माणसाबरोबर मला पहिला चित्रपट करायला मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो. असेच व्ही. शांताराम चित्रपटसृष्टीला लाभो अन् चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरू राहो. जोपर्यंत अशी माणसे मराठी चित्रपटसृष्टीला मिळतील तोपर्यंत मराठी सिनेमाला मरण नाही. -श्रीराम लागू