- Prajakta Chitnis -
मानसी जोशी रॉय साया, घरवाली उपरवाली, कुसुम यांसारख्या मालिकांमध्ये झळकली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण आता ‘ढाई किलो प्रेम’ या मालिकेद्वारे ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिच्या या कमबॅकबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...मानसी तू एक यशस्वी अभिनेत्री असताना, छोट्या पडद्यापासून इतकी वर्षं दूर का राहिलीस?मी माझ्या कारकिर्दीत अनेक वेळा ब्रेक घेतले आणि ब्रेक घेण्यामागे नेहमीच वेगवेगळी कारणे होती. मी ‘साया’, ‘घरवाली उपरवाली’ यांसारख्या मालिकांमध्ये माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काम केली होती. लग्न झाल्यानंतर मी काही वर्षांचा ब्रेक घेतला. माझी मुलगी लहान असल्याने मी अभिनयापासून दूर राहणे पसंत केले होते. नंतर माझी मुलगी तीन वर्षांची असताना मी ‘कुसुम’ ही मालिका केली. या मालिकेतील माझ्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. ही मालिका संपल्यावर लगेचच मी रोहितसोबत ‘नच बलिये’मध्ये झळकले. पण त्यानंतर मी आमच्या प्रोडक्शन हाऊसकडे लक्ष देत होते. मी कॅमेऱ्याच्यासमोर नव्हे तर कॅमेऱ्याच्यामागे अनेक वर्षं काम करत आहे. कॅमेऱ्याच्या मागे काम करत असताना मला एक समाधान मिळत होते. त्यामुळे मी कधी अभिनयाचा विचार केला नाही. इतक्या वर्षांनंतर तू अभिनयाकडे परतण्याचे कसे ठरवले? मी खरे तर अभिनयात परत येऊ की नाही याबाबत चांगलीच साशंक होते. पण मी पुन्हा अभिनयाकडे वळले पाहिजे असे नेहमीच रोहितचे म्हणणे होते आणि त्यात संदीप सिकंद ‘ढाई किलो प्रेम’ या कार्यक्रमाचा भाग होते. त्यामुळे मी मालिकेत काम करण्याचे ठरवले.ढाई किलो प्रेम या मालिकेत तुझी भूमिका काय असणार आहे?ढाई किलो प्रेम या मालिकेत अतिशय साध्या महिलेची मी भूमिका साकारत आहे. आपल्या मुलांवर अतिशय प्रेम करणारी ही स्त्री असून, ही एक अतिशय सशक्त व्यक्तिरेखा आहे.तुमचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे आणि त्यात तू रोहित रॉय, रोनित रॉय, शर्मन जोशी असे अनेक प्रसिद्ध कलाकार तुमच्या कुटुंबात आहेत. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र आणून काही प्रोजेक्ट करण्याचा विचार आहे का?मला आणि रोहितला तर अनेक वर्षांपासून एकत्र काम करायचे आहे. एका प्रोजेक्टबद्दल आम्ही विचारदेखील केला होता. पण काही कारणास्तव तो प्रोजेक्ट होऊ शकला नाही. पण भविष्यात त्याच्यासोबत काम करण्याचा माझा विचार आहे. तसेच मी, रोहित, रोनित, शर्मन यांनी एकत्र येऊन काही प्रोजेक्ट करण्याचा अद्याप तरी विचार केलेला नाही. पण भविष्यात या सगळ्यांसोबत काम करण्याचा नक्कीच विचार आहे.