कॉमेडीअन आणि अभिनेता रिकी गर्वेसला प्राण्यांबाबत फारच आपुलकी आहे. गेली अनेक वर्षे तो प्राण्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवत आला आहे. रिकीने नेहमीच प्राण्यांच्या शिकारीविरोधात आवाज उठवला आहे. आता आता टॉक शोमध्ये त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे हे सिद्ध होतं की, त्याचं प्राण्यांवर किती प्रेम आहे.
एका टॉक शोमध्ये बोलताना रिकी म्हणाला की, तो मेल्यावर त्याला लंडनमधील प्राणी संग्रहालयात वाघांसमोर जेवण म्हणून टाकलं तर त्याला काहीच हरकत नाही. तो म्हणाला की, आपण जनावरांना खातो आणि त्यांची घरे तोडतो. कमीत कमी या निमित्ताने आपण पर्यावरण आणि समाजाला काहीतरी देऊ शकू. रिकीने हेही सांगितलं की, हे बघणं इंटरेस्टींग ठरेल की, जेव्हा प्राणी संग्रहालयात टुरिस्ट हे बघतील की, एका अभिनेत्याचा मृतदेह वाघांसमोर पडला आहे. तो म्हणाला की, तेव्हा त्यांचे हावभाव बघण्यासारखे असतील.
या चॅटशो दरम्यान त्याने मृत्यूसारख्या विषयावरही भाष्य केलं. तो म्हणाला की, 'कॉमेडीअन नेहमीच मृत्यूसारख्या विषयावर बोलतात कारण यासाठी पब्लिक अवघडलेली असते. मलाही लोकांसोबत डार्क विषयांवर बोलणं फार आवडतं. मी मृत्यूवर बोलण्यासाठी फार कूल आहे. कारण एकना एक दिवस सर्वांनाच मरायचं आहे.
रिकी यासोबतच ट्रॉफी हंटिगच्याही विरोधात आहे. त्याने गेल्यावर्षी सन वेबसाइटसोबत बोलताना सांगितले होते की, जनावरांना आपल्या मनोरंजनासाठी मारणं, माझ्या दृष्टीने हा मोठा गुन्हा आहे आणि ट्रॉफी हंटिंगसारख्या गोष्टी मानवतेची लाज काढणारी आहे. दरम्यान, आफ्रिकन वाइल्डलाईन फाउंडेशननुसार जर ट्रॉफि हंटिंगसारख्या कॉन्सेप्ट्स बंद झाल्या नाही तर २०५० पर्यंत अनेक भागातील वाघांचं अस्तित्व नष्ट होईल.