Join us  

नात्यांचे साग्रसंगीत 'सेलिब्रेशन!'

By admin | Published: October 08, 2016 1:27 AM

नाती उसवली गेल्याचा सूर सध्या सतत कानी पडतो आणि भोवतालची स्थिती पाहता त्यात तथ्य असल्याचे जाणवते.

-राज चिंचणकरनाती उसवली गेल्याचा सूर सध्या सतत कानी पडतो आणि भोवतालची स्थिती पाहता त्यात तथ्य असल्याचे जाणवते. सध्या एकूणच जग जवळ आले असले, तरी माणसे एकमेकांपासून दुरावली असल्याचेही स्पष्ट होते; नव्हे माणसे तुटण्याची प्रक्रियाही जोर धरू लागल्याचे अनेकदा दिसते. अशा वेळी नातेसंबंध टिकवण्यासाठी कुणी तरी पुढाकार घेणे आवश्यक असते. ‘फॅमिली कट्टा’ या चित्रपटातले भाई व मालती अगदी हेच करतात आणि त्यातून नात्यांचे हे ‘सेलीब्रेशन’ साग्रसंगीतपणे मनाचा ठाव घेते.मधुकर म्हणजेच भाई आणि त्यांची पत्नी मालती, या सत्तरी ओलांडलेल्या जोडप्याच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस आहे आणि यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या कुटुंबाला पुण्याच्या घरी येण्याचे निमंत्रण दिलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असलेले आणि एकमेकांपासून दुरावलेले हे कुटुंबीय यानिमित्ताने तरी एकत्र येतील, यासाठी त्या दोघांचा हा खटाटोप आहे. या सोहळ्याची तयारी त्यांनी मोठ्या उत्साहाने चालवली आहे. त्यासाठी गेले तीन महिने त्यांनी खर्ची घातले आहेत. अखेर एकदाचा या सोहळ्याचा दिवस उजाडतो. भाई व मालती यांचा मोठा मुलगा बाळ, धाकटा मुलगा दीपक हे शहरातून; तर मधला मुलगा विजू गावातून पुण्याला यायला निघतात. भार्इंची मुलगी मंजूने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने भार्इंनी तिच्याशी कायम अबोला धरलेला आहे; मात्र मालतीबार्इंच्या आग्रहाखातर मंजूही इथे येण्यास निघाली आहे. भार्इंचा अमेरिकेत राहणारा नातू सिद्धार्थ आणि अभिनेत्री असलेली नात तन्वी हेसुद्धा या सोहळ्यात सामील होण्यासाठी येत आहेत. पण ते इथे पोहोचण्याआधीच अशी एक घटना घडते की या सोहळ्याचा सगळा रंगच बदलून जातो.प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी या लेखक व दिग्दर्शक जोडीने आतापर्यंत अनेक नाट्यकृती व चित्रपटांची भट्टी एकत्र जुळवून आणली आहे. हा चित्रपट म्हणजे याच मांदियाळीतले पुढचे पाऊल आहे. अतिशय मनस्वीपणे प्रशांत दळवी यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन केले आहे. त्यातून भावभावनांची आंदोलने, नात्यांचे उलगडत जाणारे पदर अलवारपणे दृश्यमान होतात; तर गोष्टीत अचानक येणारे वळण अंतर्बाह्य हेलावून टाकते. चंद्रकांत कुलकर्णी यांनी नात्यांचा हा सगळा गोतावळा ठसठशीतपणे सादर केला आहे. उत्तम स्टारकास्ट ही या चित्रपटाची महत्त्वाची बाजू आहे आणि त्यामुळे नात्यांचा हा पसारा एकजिनसी करण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. मात्र मध्यांतराला गोष्टीला वेगळे वळण मिळाल्यानंतर, चित्रपटाच्या उत्तरार्धात हे कुटुंबीय ज्याप्रकारे त्याला सामोरे जातात ते थोडे खटकते. एखाद्या गोष्टीवर किती विश्वास ठेवावा किंवा ती किती सहजतेने घ्यावी यावर अधिक विचार करणे आवश्यक असल्याचे जाणवते. ‘सेलीब्रेशन’ या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे आणि हे माध्यमांतर चांगले वठले आहे. पण काही वेळा यातले नाट्य उफाळून वर आल्याचे जाणवते. चित्रपटाचे कॅमेरावर्क आणि संकलन अचूक आहे. मुद्देसूद गोष्ट मांडताना कुठल्याही वायफळ बाबींना किंवा अवांतर गोष्टींना यात थारा दिलेला नाही, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे. चित्रपटात आघाडीचे बरेच कलावंत असले, तरी वंदना गुप्ते यांनी हा चित्रपट सरळसरळ खिशात घातला आहे. यात मालतीबाई रंगवताना त्यांनी जे बेअरिंग घेतले आहे; ते अभिनयाचे उत्तम उदाहरण कायम करणारे आहे. वरवर पाहता ही भूमिका तशी साधी वाटत असली, तरी तिच्या अंतरात्म्याला वंदना गुप्ते ज्याप्रकारे भिडल्या आहेत, ते महत्त्वाचे आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात तर त्यांनी कमालच केली आहे. क्या बात है, असेच त्यांच्या या भूमिकेबद्दल म्हणायला हवे. भार्इंच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर यांनी चांगली खेळी खेळली आहे. त्यांचे अनुभवीपण लक्षात घेता त्यांच्यासाठी ही भूमिका साकारणे फार विशेष होते अशातला काही भाग नाही. पण त्यांनी त्यांचे ‘भाई’पण मात्र उत्तम ठसवले आहे. या दोन प्रमुख व्यक्तिरेखांना किरण करमरकर, प्रतीक्षा लोणकर, सई ताम्हणकर, संजय खापरे, सचिन देशपांडे, सुलेखा तळवलकर, आलोक राजवाडे, गौरी नलावडे, आदेश श्रीवास्तव या ‘कुटुंबीयांनी’ चांगली साथ दिली आहे. सईने एका गंभीर प्रसंगात तिची प्रभावी छाप पाडली आहे. मनोरंजनासह काही बोध घ्यावा, हे या चित्रपटाचे अप्रत्यक्ष सांगणे आहे आणि या चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच संपूर्ण ‘फॅमिली’सोबत या नात्यांचा गोडवा चाखायला हवा हेही तितकेच महत्त्वाचे आहे.