दीपिका कक्कड हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. ससुराल सिमर का ही तिची मालिका प्रचंड गाजली. अनेक मालिकांमध्ये काम केलेली दीपिका मात्र गेल्या काही काळापासून छोट्या पडद्यापासून दूर होती. मात्र, आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिका 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मास्टरशेफ ऑफ इंडिया या लोकप्रिय शोचा पुढचा सीझन 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शोची घोषणा करण्यात आली होती. तर आता याचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दीपिका कक्कडने बनवलेल्या पदार्थाचं शेफ कौतुक करत आहेत. ते पाहून दीपिकाच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसत आहे. "मी त्या प्रत्येक महिलेचं प्रतिनिधित्व करते जिला हे बोललं जातं की अरे हिला किचनमध्ये जाऊन जेवणच तर बनवायचं आहे. हो मी होमकूक आहे", असं दीपिका म्हणते. त्यानंतर फराह खान तिला म्हणते, "जे तुला ट्रोल करतात त्यांना उत्तर मिळालं".
दीपिकाचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. "प्रत्येक वेळी हिला रडायचं का असतं?", "त्यांना हवा होता तो ड्रामा मिळाला", "प्रत्येक वेळी ओव्हरअॅक्टिंग आणि ड्रामा", "न रडता पण हे सांगू शकली असती", "मास्टरशेफ सिमर का", "ओव्हरअॅक्टिंग बंद कर...हे ससुराल सिमर का नाही", अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'सेलिब्रिटी मास्टर शेफ'मध्ये तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, अर्चना गौतम, राजीव अदातिया, निक्की तांबोळी, फैसल मलिक, दीपिका कक्कड, उषा नाडकर्णी, कबिता सिंह हे कलाकार सहभागी होणार आहेत. या शोचं परिक्षण मास्टरशेफ इंडिया फेम रणवीर बरार आणि विकास खन्ना करणार आहेत. तर फराह खान हा शो होस्ट करणार आहे. लवकरच 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे.