संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) अखेर प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. आज कार्यक्रमाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. गेल्या १० वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण सध्या टीआरपीत घसरण झाली असल्याने हा कार्यक्रम लवकरच निरोप घेणार अशी चर्चा होती. अखेर तो दिवस आला आहे. या शुक्रवारी कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे या चौघांनाच आजच्या शेवटच्या शूटची कल्पना दिली होती.
हसताय ना? हसायलाच पाहिजे असं म्हणत डॉक्टर निलेश साबळे गेल्या १० वर्षांपासून कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत. सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भाऊ कदम या कलाकारांना कमालीची लोकप्रियता मिळाली. या सर्व कलाकारांनी मिळून कार्यक्रमाला सातासमुद्रापार पोहोचवले. शाहरुख खान, सलमान खान पासून माधुरी दीक्षित सारख्या अनेक हिंदी सेलिब्रिटींनीही कार्यक्रमात हजेरी लावली. मराठी सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनीही काही एपिसोड्समध्ये उपस्थिती दर्शवली होती. पण शेवटच्या काही वर्षात कार्यक्रमाचा टीआरपी घसरला, सागर कारंडेने शो सोडल्याने चाहते नाराज झाले होते. तर काही दिवसांपूर्वीच खुद्द निलेश साबळेंनीच वैयक्तिक कारणांनी शोला रामराम केला. आता अखेर हा शो संपत असून शुकरटवाडीत आज शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. यामुळे कलाकारांसोबत चाहतेही भावूक होणार आहेत यात शंका नाही.
काही दिवसांपूर्वीच श्रेया बुगडेने सेटवरचा ग्रुप फोटो शेअर केला होता. दशकपूर्तीनिमित्त तिने फोटो पोस्ट केला होता आणि चाहत्यांचे आभार मानले होते. यामध्ये निलेश साबळे आणि सागर कारंडे दिसले नाहीत म्हणून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. आतापर्यंत कोणीही 'चला हवा येऊ द्या' संपत असल्याचं मान्य केलं नव्हतं. पण आज शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याचं जाहीर झालं.
दुसरीकडे कुशल बद्रिकेने अगोदरच हिंदी कॉमेडी शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. 'मॅडनेस मचाएंगे' मधून तो प्रेक्षकांना हसवणार आहे. शिवाय मराठी सिनेमांमध्येही तो काम करत आहे.