चला हवा येऊ द्या मधील अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या पत्रांमुळे नकळत आपले डोळे पाणावतात. ते अनेक वेळा आपल्या पत्रांद्वारे सद्यस्थितीवर भाष्य करत असतात. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी नुकताच एक ब्लॉग लिहिला असून या ब्लॉगची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे. प्रश्न नौकरी का उद्योगधंदा हा असला पाहिजे. आणि दोन्हीपैकी एकतरी उत्तर मिळालं पाहिजे असे फेसबुकवर लिहित त्यांनी त्यांचा ब्लॉग शेअर केला आहे. सावधान... सावधान असे त्यांच्या ब्लॉगचे शीर्षक आहे.
प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे. प्रश्न नौकरी का उद्योगधंदा हा असला पाहिजे. आणि दोन्हीपैकी एकतरी उत्तर मिळालं पाहिजे.
Posted by Arvind Jagtap on Wednesday, March 10, 2021
त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे मराठी माणसाच्या मनात असलेली गोष्ट मांडली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “मराठी माणसांचा महाराष्ट्र. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री म्हणून पाठ थोपटून घेणारे आपण. पण आपल्या राज्यात वीज, मोबाईल, अन्नधान्याची दुकानं यासारख्या व्यवसायात मराठी माणूस औषधाला नसेल तर हे कशाचं लक्षण आहे? मराठी माणूस व्यवसायात मागे का आहे यावर फक्त चर्चाच होतात. कृती होत नाही. अगदी अगदी छोट्या गावात सचोटीने व्यवसाय करणारे व्यापारी अमराठी आहेत. त्यांची एकी आहे. एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती आहे. आपल्या लोकांना भांडवल पुरवण्याची तयारी आहे. साधा भंगार सामानाचा व्यापार बघा, लाकडांच्या वखारी बघा, देशी दारूचा व्यवसाय बघा ठराविक नावं दिसतात वर्षानुवर्ष. मोठमोठ्या बिल्डर्सची नावं बघा. मुंबईतल्या प्रमुख पन्नास उद्योगपतींची यादी बघा. देश आपला आहे. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. मोठे होतात. व्हायलाच हवेत. पण मराठी माणूस या सगळ्यात कुठे आहे?”
“मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे आहे याला इतर धर्मांचे, राज्याचे लोक कारण आहेत असं अजिबात नाही. स्वतःच्या राज्यात इतर लोक प्रगती करू देत नाहीत असं म्हणणं म्हणजे वेडेपणा होईल. मराठी माणूस स्वतःच्या अधोगतीला कारण आहे. एकतर आपल्या मुख्यमंत्र्याची निवड कायम दिल्लीतून होत आली. त्यामुळे दिल्लीच्या कलाने कारभार करणे चालू राहिले. आपल्या नेत्यांच्या तक्रारी करण्यासाठी कायम मराठी नेते दिल्लीत असायचे. एकदा एक माजी पंतप्रधान महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करायला आले होते म्हणे. पण स्थानिक नेत्यांनी त्यांना बदामाचा शिरा दिला खायला. एकदम भारी बडदास्त ठेवली. पंतप्रधान हैराण झाले. त्यांना प्रश्न पडला इथे कसला आलाय दुष्काळ? हे लांगुलचालन वरचेवर वाढत गेलं. आपले उद्योगधंदे शेजारच्या राज्यात गेले तरी आपण शब्द काढला नाही. मराठी माणूस राजकारण निवडणुकीपुरते ठेवत नाही. ते चोवीस तास जगू लागतो. राजकारण हाच कायम उद्योग होऊन बसल्यावर माणसं उद्योगधंद्यात मोठी कशी होणार?,” असा प्रश्न सर्व मराठी लोकांना त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे विचारला आहे.