‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya ) हा सगळ्यांचाच आवडता शो. केवळ सामान्य प्रेक्षकांमध्येच नव्हे तर सेलिब्रेटींमध्ये देखील हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आजवर या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या शोचा होस्ट डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale) सतत चर्चेत असतो. त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक फॅन्स आहेत. पण सध्या त्याची नाही तर त्याच्या ‘सावित्री’ची चर्चा आहे. होय, झी मराठीवर आज ‘सत्यवान सावित्री’ ही नवी कोरी मालिका सुरू झालीये. या मालिकेच्या निमित्तानं निलेश साबळेनं त्याच्या ‘सावित्री’बद्दल अर्थात पत्नीबद्दल खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
निलेश साबळेच्या पत्नीचं नाव गौरी साबळे आहे. निलेश हा अभिनेता असला तरी तो आयुर्वेदिक डॉक्टर आहे, हे सगळ्यांच माहित आहे. निलेशची पत्नी ही सुद्धा डॉक्टर आहे. निलेश मोठा सेलिब्रिटी असला तरी गौरी कायम लाईमलाईटपासून दूर राहते. पण निलेशची सावली बनून वावरते.
माझ्या प्रत्येक कामात ती साथ देते. ती सुद्धा कलाकार आहे. ती उत्तम गाते. तिला चित्रकलेची आवड आहे. पण केवळ आणि केवळ मला पुढे जाता यावं म्हणून ती तिच्या या कलांकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आली आहे. मला वाटतं की, तिने सुद्धा तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करावं. माझ्या प्रत्येक गोष्टीत ती माझी साथ देते. माझं जास्त जागरण होऊ नये म्हणून तिने लिखाण, एडिटींगसुद्धा शिकून घेतलं आहे. ती विनोद सुचवते, वेगवेगळ्या कल्पना मांडते या सगळ्या गोष्टीत ती फार चांगल्यारितीने सहभाग दर्शवते. मला माझ्या कामात आनंद मिळावा, असे तिला सतत वाटत असते. ती माझी सावित्री आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो, असं निलेश म्हणाला.
अशी सुरू झाली होती लव्हस्टोरीनिलेश आणि गौरी एका कॉलेजमध्ये नव्हते. मग त्यांची ओळख कशी झाली? तर निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला असता तिथं गौरीसोबत त्याची ओळख झाली. त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले. नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 2013 साली दोघांनी लग्न केलं.