मुंबई – झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या कार्यक्रमातील सूत्रसंचालक निलेश साबळे आणि इतर कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. चित्रपटांच्या प्रमोशनपासून अगदी राजकीय नेत्यांच्या मिमिक्रीपर्यंत अनेकांनी या टीमचं कौतुक केले आहे. परंतु या शोमधील निवेदक आणि दिग्दर्शक निलेश साबळे(Nilesh Sabale) यांना केंद्रीय मंत्री नारायण राणेंची(Narayan Rane) पाया पडून माफी मागायला लागली आहे.
काही दिवसांपूर्वी झी मराठीवर दिवाळी अधिवेशन कार्यक्रमात नारायण राणे यांच्याशी हुबेहुब जुळणारं पात्र दाखवण्यात आले होते. यात नारायण राणेंची बदनामी होईल असं पात्र रंगवण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचं राणे समर्थकांकडून सांगण्यात आलं. सोशल मीडियातही याबाबत बरीच चर्चा आणि वाद रंगले. अखेर या वादावर पडदा टाकण्यासाठी निलेश साबळे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
झी मराठीवर हा शो प्रदर्शित झाल्यापासून अनेक राणे समर्थकांनी झी मराठी आणि निलेश साबळे यांना फोन करुन संताप व्यक्त केला होता. त्यानंतर निलेश साबळे आणि कार्यक्रमातील काही सहकाऱ्यांनी मिळून राणेंच्या अधिश निवासस्थानी भेट दिली. या भेटीत निलेश साबळे यांनी राणे यांची हात जोडून, पाया पडत दिलगिरी व्यक्त केली. यावेळी भाजपाचे आमदार नितेश राणे हेदेखील उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे हेदेखील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षक आहेत. त्यांनी वेळोवेळी कलाकारांचा सन्मान केला आहे. आमचा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नाही असं निलेश साबळे यावेळी म्हणाल्याची माहिती देण्यात आली आहे.