गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरीवर विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya) ने प्रेक्षकांचं खूप चांगल्या पद्धतीनं मनोरंजन केलं. कार्यक्रमातील प्रत्येक विनोदी पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आपल्या विनोदी शैलीतून डॉ.निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही
आता गेल्या काही दिवसांपासून एक बातमी कानावर पडतेय की डॉ.निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या' मध्ये दिसणार नाहीत. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा दिग्दर्शक, निवेदक असलेले डॉक्टर निलेश साबळे या कार्यक्रमातून निरोप घेणार आहेत. नुकतेच निलेश साबळे यांनी एबीपी माझाशी बोलताना कार्यक्रमातून काही दिवस बाहेर असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सध्या चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. तब्येतीच्या कारणाने मी थोडेदिवस मी कार्यक्रमातून बाहेर असणार आहे'.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या कार्यक्रमाचे अनेक पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यात 'होऊ दे व्हायरल', 'सेलिब्रिटी पॅटर्न', 'लहान तोंडी मोठा घास', अशा अनेक पर्वांचा समावेश आहे. निलेश साबळे हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. तर कधी-कधी वेगवेगळ्या भुमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.