Join us

'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप? निलेश साबळे म्हणाले, "गेली नऊ वर्ष..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 12:29 PM

"वाहिनीकडून सांगण्यात आलं की...'', 'चला हवा येऊ द्या' बंद होण्याच्या चर्चांवर निलेश साबळे काय म्हणाले?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. गेल्या कित्येक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. श्रेया बुगडे, भाई कदम, निलेश साबळे, कुशल बद्रिके या कलाकारांना 'चला हवा येऊ द्या'मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तर अनेक नवोदित कलाकारांनाही या कार्यक्रमामुळे संधी मिळाली. पण, आता 'चला हवा येऊ द्या' प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

२०१४ साली सुरू झालेल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने गेली नऊ वर्ष प्रेक्षकांना लोटपोट हसवलं. पण, आता हा कार्यक्रम काही काळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लोकप्रियता आणि टीआरपीत घट झाल्याने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत अभिनेता आणि दिग्दर्शक निलेश साबळे 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "चला हवा येऊ द्या कार्यक्रम थांबत असला तरी प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरुपी राहील. गेली नऊ वर्ष एक हजाराहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण टीमला या कार्यक्रमाला नाव, ओळख आणि त्याचबरोबर आर्थिक स्थिरता दिली. तूर्तास थांबत आहोत, असं वाहिनीकडून सांगण्यात आलं आहे. पण, पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते." 

निलेश साबळेंच्या या वक्तव्यामुळे 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा शेवटचा भाग चित्रीत होणार आहे. रितेश देशमुखच्या 'लय भारी' चित्रपटाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या कार्यक्रमात मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. आता अखेर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

टॅग्स :चला हवा येऊ द्याझी मराठीटिव्ही कलाकार