‘सत्या’मधील गॅँगस्टर भिखू म्हात्रे असो वा ‘शूल’ चित्रपटात सिस्टमला विरोध करणारा पोलिसवाला असो, या प्रत्येक भूमिकेत छाप पाडणारा अभिनेता मनोज वाजपेयी याचा बॉलिवूड प्रवास खूपच रोचक राहिला आहे. मनोज वाजपेयी बॉलिवूडमधील एकमेव असे नाव आहे, ज्याने प्रत्येक भूमिका पडद्यावर जिवंत केली आहे. भूमिका कोणतीही असो त्याकडे आव्हान म्हणून पाहाणारा मनोज ‘सरकार-३’मध्येही अशाच प्रकारची भूमिका साकारताना दिसतो आहे. या चित्रपटानिमित्त त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने दिलखुलासपणे आपला बॉलिवूडप्रवास कथन केला.प्रश्न : तुझ्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये तू नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत, या सगळ््यांमध्ये कोणत्या भूमिकेवर जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागली?खरं तर मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात. त्यातही एखादी भूमिका खूपच अवघड वाटत असल्यास त्याकडे मी एक आव्हान म्हणून बघतो अन् ती भूमिका मी स्वीकारतो. मग ‘सत्या’मधील भिखू म्हात्रेची भूमिका असो वा अलीकडच्या ‘अलीगढ’ या चित्रपटातील प्रोफेसर रामचंद्र सिरसची भूमिका असो, या भूमिका साकारताना मी त्याचा आनंद घेतो. वास्तविक आतापर्यंत माझ्या करिअरमध्ये मी सर्वच भूमिकांकडे आव्हानात्मक दृष्टीतून बघितले आहे; त्यामुळे एखादीच आव्हानात्मक भूमिका सांगणे मला अवघड होईल. भविष्यात मी वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करू इच्छितो. प्रश्न : कलाकार दिग्दर्शकांच्या सल्ल्यानुसार आपली भूमिका समजून घेत असतो, परंतु त्यास तू अपवाद आहेस, काय सांगशील?होय, हे खरं आहे. माझी भूमिका मी स्वत:च समजून घेतो. त्यामुळे दिग्दर्शकांकडून मला सेटवर प्रचंड सूट मिळत असते. बऱ्याचदा दिग्दर्शक आणि मी शूटिंगनंतरच भेटत असतो. याचा अर्थ मी कशाही पद्धतीने भूमिका करावी, असा होत नाही. दिग्दर्शकांचा विश्वास सार्थकी लावण्याचेही दडपण असतेच. सुदैवाने आतापर्यंत मी त्यात यशस्वी ठरलो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. खरं तर अभिनय करताना एवढी मोकळीक मिळणे ही दिग्दर्शकांची कृपाच म्हणावी लागेल. प्रश्न : ‘सरकार-३’मधील तुझी भूमिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी मिळतीजुळती आहे, काय सांगशील?खरं तर ‘सरकार-३’मध्ये माझ्या वाट्याला आलेली भूमिका खूपच कमी आहे; मात्र असे असले तरीही ती दमदार आहे. चित्रपटात मी एका राजकारण्याच्या भूमिकेत असून, तो सरकारच्या गुंडागर्दीला विरोध करताना दिसतो. तरुण, निर्भीड अन् तेवढाच प्रभावी राजकारणी म्हणून मी यात दिसत आहे. या राजकारण्याचा कुठल्याही वास्तवाशी संबंध नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी फक्त मुख्यमंत्री केजरीवाल यांचा लूक घेतला आहे; बाकी कॅरेक्टर पूर्णपणे वेगळे आहे. प्रश्न : गॅगस्टरशी संबंधित बऱ्याच चित्रपटांमध्ये तू भूमिका केली आहेस, याचे काही विशेष कारण?तसं विशेष कारण काही नाही. मला जी भूमिका आॅफर केली गेली, ती प्रामाणिकपणे साकारायची हा एकच विचार डोक्यात असतो. ‘सत्या’मध्ये मी भिकू म्हात्रेच्या भूमिकेत होतो. पुढे ‘शूटआउट अॅट वडाला’, ‘गॅग्स आॅफ वासेपुर’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्याचबरोबर ‘राजनीती’सारख्या चित्रपटात राजकारणीची भूमिका केली. इंडस्ट्रीमध्ये काही दिग्दर्शक असे आहेत, ज्यांना मी कधीच नकार देऊ शकत नाही, हेही त्यामागचे कारण म्हणावे लागेल. प्रश्न : ‘सरकार-३’मध्ये अमिताभ बच्चन आणि जॅकी श्रॉफ या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा राहिला? चित्रपटात जॅकीदासोबत माझा एकही सीन नाही. परंतु अमिताभजींसोबत मी काही सीन्स केले आहेत. खूपच दमदार कलाकार असून, आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. शिस्त आणि प्रोफेशनल अशा पद्धतीने ते सेटवर वावरत असतात. त्यांच्यासोबतचा हा माझा चौथा चित्रपट असून, प्रत्येक चित्रपटातून त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यास मिळाले आहे. (मुलाखत : सतीश डोंगरे)
आव्हानात्मक भूमिका आवडतात
By admin | Published: May 12, 2017 1:18 AM