Join us

कंगनासोबतच्या फोटोमुळे ह्रतिकच्या अडचणी वाढण्याची शक्यता

By admin | Published: April 26, 2016 11:44 AM

ह्रतिक आणि कंगनाचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे ज्यामुळे नवे प्रश्न उपस्थित होत आहेत.

ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 26 - अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यामधील कायदेशीर लढाई प्रत्येक दिवशी नवं वळण घेत आहे.  हृतिक रोशन आणि कंगना राणावत दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. एकीकडे हृतिक रोशन आपला कंगनाशी काहीच संबंध नसल्याचं सांगत आहे तर दुसरीकडे कंगना ह्रतिक खोटं बोलत असल्याचा दावा करत आहे. मात्र सध्या हृतिक आणि कंगनाचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे ज्यामुळे नवे प्रश्न उपस्थित राहू लागले आहेत. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार क्रिश चित्रपटाच्या पार्टीदरम्यान हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोच्या आधारावर दोघे रिलेशनशिपमध्ये होते की नव्हते ? हे सांगणं कठीण आहे. पण या फोटोमुळे प्रकरणाला नवं वळण मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हृतिक रोशनने आपण कंगनासोबत फक्त व्यवसायिक संबंध ठेवल्याचं अनेकदा सांगितलं आहे. पण या फोटोमुळे हृतिकच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. 
कंगनाने हृतिकचा 'सिली एक्स' असा उल्लेख केल्यानंतर या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली होती. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनीच हा फोटो व्हायरल केल्याचीदेखील चर्चा आहे. कंगनाची बहिण रंगोलीने हृतिकला 25 मे 2014 ला मेल पाठवून बनावट मेल आयडीची संयुक्त तक्रार करण्याच आवाहन केलं असतानादेखील हृतिकने तक्रार का केली नाही ? असा सवाल रिझवान सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे. 
 
हृतिक रोशनचे वकिल दिपेश मेहता यांनी चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत. साक्षीदार म्हणून कंगना राणावतची 30 एप्रिलला चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. दिपेश मेहता यांनी पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांमध्ये 40 ईमेल्सची माहिती दिली आहे. हे मेल कंगना राणावतने हृतिक रोशनच्या ख-या ईमेल-आयडीवर पाठवले होते. 24 मे 2014 नंतर हे मेल पाठवण्यात आले आहेत. 24 मार्चला ह्रतिकने बनावट ईमेल आयडीची तक्रार केली होती.