Chandramukhi : अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare ) यांचा ‘चंद्रमुखी’ हा मराठी चित्रपट आज प्रदर्शित झाला. तूर्तास या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ‘चंद्रमुखी’च्या टीमनं या चित्रपटाचं प्रमोशन केलं. अगदी ‘चंद्रमुखी’ची टीम मुंबई विमानतळावर पोहोचली. स्पाइस जेटच्या विमानावर झळकण्याचा मान अमृताला मिळाला. ‘चंद्रमुखी’च्या विमानावरील या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगलीये.
गुरूवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळतळाचा परिसर या प्रमोशन इव्हेंटनं एकदम गजबजून गेला होता. ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल अशा उत्साही वातावरणात अमृता चंद्रा बनून विमानतळावर अवतरली. दौलत अर्थात आदिनाथ कोठारेही तिच्यासोबत होता. यावेळी अमृताने झक्कास लावणीही सादर केली.
अमृता आणि आदिनाथ यांनी विमानतळावरील या इव्हेंटचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘माझी चंद्रमुखी आता आकाशात झेप घेणार! उद्यापासून ती तुम्हा माय बाप प्रेक्षकांची होणार! माझ्या चंद्राची काळजी घ्या.. घेणार नं ?, असं हा व्हिडीओ शेअर करताना आदिनाथने लिहिलं आहे.
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रसाद ओकने दिग्दर्शित केला आहे. पानिपत, महानायक, झाडाझडती यांसारख्या अनेक दर्जेदार कादंबºयांचे लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित हा आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.