Join us

ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे निधन, ‘रामायण’ मालिकेत साकारले होते आर्य सुमंतचे पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:18 AM

Chandrashekhar Death: 50 च्या दशकात अनेक सिनेमात त्यांनी मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. पुढे चरित्र अभिनेते म्हणून ते नावारूपास आले होते. 

ठळक मुद्दे1998 साली ‘रामायण’ या मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती.

50 व 60 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते चंद्रशेखर (Chandrashekhar) यांचे आज सकाळी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. मुंबईत अंधेरीतील आपल्या राहत्या घरी सकाळी 7.10 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्रशेखर दीर्घकाळापासून आजारी होते. 50 च्या दशकात अनेक सिनेमात त्यांनी मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. पुढे चरित्र अभिनेते म्हणून ते नावारूपास आले होते. (veteran actor Chandrashekhar died of long illness)

चंद्रशेखर यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वैद्य होते. त्यांच्या कुटुंबीयांनी चंद्रशेखर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आजोबांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात ताप आल्याने त्यांना जुहूच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र एकाच दिवसात ताप उतरल्याने आम्ही त्यांना घरी आणले होते. अखेरचे क्षण कुटुंबासोबत घालवावे, अशी त्यांची इच्छा होती. घरी रूग्णालयासारख्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने आम्ही त्यांच्या इच्छेनुसार घरी आणले होते, असे कुटुंबीयांनी सांगितले.

चंद्रशेखर यांनी 50 च्या दशकात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरूवात केली होती. पुढे अनेक सिनेमात ते हिरो म्हणून झळकले. व्ही शांतराम यांच्या ‘सुरंग’ या सिनेमात त्यांना हिरो म्हणून पहिला ब्रेक मिळाला होता. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मस्ताना, बरादरी, काली टोपी लाल रूमाल, स्ट्रीट सिंगर अशा अनेक सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. अर्थात काही वर्षांनंतर हिरोच्या भूमिका मिळेनाशा झाल्यात आणि चंद्रशेखर यांनी चरित्र भूमिका करायला सुरूवात केली. कटी पतंग, हम तुम और वो, अजनबी, महबूबा, अलग अलग, शक्ती, शराबी, डिस्को डान्सर, नमक हलाल, द बर्निंग ट्रेन अशा हिट सिनेमात त्यांनी चरित्र भूमिका जिवंत केल्यात.

1998 साली ‘रामायण’ या मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेतील ते सर्वात वयोवृद्ध कलाकार होते. त्यावेळी त्यांचे वय 65 वर्ष होते. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती.

टॅग्स :रामायणबॉलिवूड