Join us

Chandrayaan-2: चांद्रयान-२ च्या यशस्वी मोहिमेसाठी बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले इस्रोचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 4:22 PM

इस्रोच्या या कामगिरीसाठी देशभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. सामान्य व्यक्तीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील ट्विटरद्वारे कौतुकांचा वर्षाव करत आहे.

ठळक मुद्देरवीनाने हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चंद्रासोबतचा आपला रोमान्स असाच सुरू राहाणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी इस्त्रोला खूप साऱ्या शुभेच्छा

130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. गेल्या रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र आज हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले. 

 

इस्रोच्या या कामगिरीसाठी देशभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. सामान्य व्यक्तीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील ट्विटरद्वारे कौतुकांचा वर्षाव करत आहे. अक्षय कुमारने लिहिले आहे की, या यशासाठी अनेक तास मेहनत घेणाऱ्या टीमचे जितके कौतुक करू तितके कमीच आहे.

 

विवेक ऑबेरॉयने देखील इस्त्रोला शुभेच्छा देत म्हटले आहे की, ऐतिहासिक कामगिरीसाठी सगळ्यांना शुभेच्छा... या मिशनच्या यशासाठी आम्ही सगळेच प्रार्थना करत आहोत. आज प्रत्येक भारतीयासाठी हा गौरवशाली क्षण आहे.

 

निर्मत कौरने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, या कामगिरीत भाग घेतलेल्या प्रत्येक टीम मेंबरचे अभिनंदन... 

 

आर. माधवनने इस्त्रोला शुभेच्छा देत लिहिले आहे की, फॅनटास्टिक लिफ्टसाठी सगळ्यांचे अभिनंदन...

 

रवीनाने हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चंद्रासोबतचा आपला रोमान्स असाच सुरू राहाणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी इस्त्रोला खूप साऱ्या शुभेच्छा

 

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. जवळपास 7500 लोकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. यासाठी इस्त्रोने 10000 लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. दरम्यान, आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणार असून त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल आणि 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल.

 

चांद्रयान 2 ला पृथ्वीच्या कक्षेत पोहोचविण्यासाठी इस्त्रोने शक्तिशाली रॉकेट जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क 3 (जीएसएलव्ही-एमके 3) वापर केला. या रॉकेटला स्थानिक प्रसारमाध्यमांनी 'बाहुबली' असे नाव दिले आहे. या रॉकेटचे वजन 640 टन असून रॉकेटची किंमत 375 कोटी रुपये आहे. या रॉकेटने 3.8 टन वजनाच्या चांद्रयान-2 या यानाला घेऊन उड्डाण केले. या यानाच्या निर्मितीचा खर्च 6.3 कोटी रुपये आहे. आतपर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच यान चंद्रावर नेले आहे.

 

2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 ही मोहीम आखली होती. हे यान निरीक्षण करणारे होते. या यानाने 10 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता.

 

टॅग्स :चांद्रयान-2