भारताचं ‘चांद्रयान ३’ चंद्राच्या कक्षेत फिरत असून आज(२३ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यानातील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रोच्या या मोहिमेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. आजचा दिवस भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे. चांद्रयान ३ने अवकाशात यशस्वी झेप घेतल्यापासून भारतीय या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अनेक सेलिब्रिटींनी चांद्रयान ३ मोहिमेसाठी इस्त्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही या मोहिमेबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तानुसार, परेश रावल यांनी इस्त्रोच्या या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “एक भारतीय म्हणून मला गर्व होत आहे. यासाठी मी खूप उत्सुक आहे. आपल्या देशाला साधू आणि गारुड्यांची भूमी म्हणणाऱ्यांनो पाहा, आज हा देश चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.”
दरम्यान, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. लँडिंगची प्रक्रिया ही संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होऊन ६ वाजून ४ मिनिटांनी पूर्ण होईल. हे सॉफ्ट लँडिंग यशस्वीरीत्या पूर्ण न झाल्यास प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. आज लँडिग न झाल्यास २७ ऑगस्टला लँडिंगचा प्रयत्न करण्यात येणार आहे.