सप्टेंबर उजाडला की एकांकिका स्पर्धांचा हंगाम सुरू होतो. सगळे हौशी प्रायोगिक रंगकर्मी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कंबर कसतात. मोठ्या मेहनतीने स्पर्धांमध्ये भाग घेतात, पण काही नियम व अटी कलाकार आणि यशाच्या आड येतात. हेच नियम आता काळानुरूप बनलण्याची गरज असल्याचे लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचे म्हणणे आहे.
एकांकिका स्पर्धा हे मराठी रंगभूमीचे मोठे बलस्थान आहे. इथे नवोदित कलाकार-तंत्रज्ञ तयार होतात. त्यामुळे या स्पर्धा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असाव्यात. त्यांना अटी आणि नियमांमध्ये अडकवून त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असे मत फेसबुकवर व्यक्त केल्यानंतर राजेश देशपांडे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, नवोदितांकडून चांगले सादरीकरण व्हावे, त्यांना त्यातून शिकायला मिळावे हा एकांकिका स्पर्धांचा हेतू असतो, पण बऱ्याच स्पर्धांमध्ये अटी आणि नियमांचे पालन करतानाच त्यांची दमछाक होते. मागच्या वर्षी पुरुषोत्तम करंडकमध्ये कोणत्याही एकांकीकेला पारितोषिक देण्यात आले नव्हते. अशा वेळी निकालाबाबत कलाकारांच्या मनात साशंकता असते. त्यामुळे स्पर्धा जाहिर होतात तेव्हा परीक्षकांची नावे घोषित व्हायला हवीत असेही ते म्हणाले..........................अटल करंडक, कल्पना एक आविष्कार अनेक, कणकवलीतील नाथ पै अशा महाराष्ट्रात लहान-मोठ्या जवळपास २०० ते ३०० स्पर्धा होतात. यात अंदाजे हजार संस्था सहभागी होतात. त्यातून ५००० कलाकार आणि १००-२०० तंत्रज्ञ घडतात. सप्टेंबरपासून जानेवारी अखेरपर्यंत स्पर्धांचा हंगाम असतो. २६ जानेवारीला सवाई एकांकीका स्पर्धा शेवटची होते. ........................हे बदल अपेक्षित...
- नवीन एकांकिकेसाठी लेखकाला तात्पुरत्या सेन्सॉर सर्टिफिकेटवर एकांकिका करण्याची परवानगी द्यावी. प्राथमिक व अंतिम फेरीचा कालावधी खूप कमी असल्याने त्या वेळेत कायमस्वरूपी सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवणे अवघड जाते.
- लेखक हयात नसलेल्या पूर्वी अनेक स्पर्धांमध्ये सादर झालेल्या, पुस्तकात छापून आलेल्या जुन्या एकांकिकांचा डीआरएम क्रमांक ग्राह्य धरावा. कारण त्यांचे सेन्सॉर सर्टिफिकिट मिळवणे खूप अवघड किंवा अशक्यच असते.
- आंतर महाविद्यालयीन स्पर्धा वगळता इतर खुल्या स्पर्धांमध्ये एका कलाकाराला अनेक एकांकिकांमध्ये अभिनयाची मुभा असावी. जर एका लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या, तंत्रज्ञांच्या एकाच स्पर्धेत अनेक एकांकिका असू शकतात, तर कलाकारांनाही ती असावी. कुठल्या भूमिकेला बक्षीस द्यायचे हे परीक्षक ठरवतील.
- अंतिम फेरीत नेपथ्य लावणे, प्रकाश योजना करणे आणि सादरीकरणाला केवळ एक तास दिला जातो. शक्य असेल त्या आयोजकांनी ही वेळ वाढवावी.
- निकालानंतर परीक्षकांनी स्पर्धक कुठे कमी पडले व त्यांच्यात आणखी काय सुधारणा व्हाव्यात हे संवाद साधून सांगावे. असे पूर्वी काही स्पर्धांना होत असे.