अमर प्रेम या मालिकेतून पदार्पण केलेला चॉकलेट बॉय वैभव तत्त्ववादीची गाडी सध्या सुसाट सुटली आहे, असंच म्हणावं लागेल. कारण ‘कॉफी आणि बरचं काही’ चित्रपटानंतर त्याला अनेक चित्रपटांत अभिनय करताना पाहायला मिळत आहे. शॉर्टकट - दिसतो पण नसतो, तर लवकरच प्रदर्शित होणारा मिस्टर अँड मिसेस सदाचारी आणि बॉक्स आॅफीसवर कोट्यवधींमध्ये गल्ला जमवलेला सुपरहिट चित्रपट बाजीराव मस्तानी चित्रपटातही त्याने त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे. या यशस्वी घोडदौडीनंतर वैभव आता लवकरच ‘चीटर’ या चित्रपटातही अभिनय करताना दिसेल. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, १ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल. अर्थातच या चित्रपटात वैभव मुख्य भूमिका साकारत असून, त्याच्यासमवेत हृषीकेश जोशी, पूजा सावंत, आसावरी जोशी, सुहास जोशी आदी कलाकार आहेत. अजय फणसेकर चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, कथा आणि पटकथा आणि संवादही त्यांनी स्वत:च लिहिले आहेत. दिसायला एकदम साधा-भोळा असणारा हा अभिनेता शॉर्टकट चित्रपटातही हॅकिंगमध्ये किडे करताना दिसला होता. आता त्याची ही इमेज चीटर चित्रपटातून अजून बदलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यात भरीस भर म्हणून या पोस्टरवरील वैभवचा फोटो सर्वांमध्येच उत्सुकता निर्माण करीत आहे.
हॅकरनंतर वैभव बनला ‘चीटर’
By admin | Published: January 30, 2016 3:13 AM