चिरंजीवी हे साऊथ सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारे चिंरजीवी आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. चिरंजीवींनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू हवा असल्याचं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. या वक्तव्यामुळे चिरंजीवींना ट्रोलही केलं जात आहे. 'ब्रह्म आनंदम' या सिनेमाच्या प्री रिलीज इव्हेंटमध्ये चिरंजीवींनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राम चरणला पुन्हा मुलगी होण्याची भीती वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले चिरंजीवी?
"जेव्हा मी घरी असतो तेव्हा नातींच्या गोतावळ्यात आहे, असं मला वाटत नाही. तर एका लेडीज हॉस्टेलचा वॉर्डन असल्यासारखं मला वाटतं. माझ्या आजूबाजूला केवळ महिलाच असतात. यावेळी तरी मुलगा होऊ दे, असं मी राम चरणला सांगत असतो. जेणेकरून आमचा वारसा पुढे जाईल. पण, त्याची मुलगी त्याचा जीव की प्राण आहे. त्याला पुन्हा मुलगीच होईल अशी मला भीती वाटते".
चिरंजीवींच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. सोशल मीडियावर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. राम चरण हा चिरंजीवींचा मुलगा आहे. त्यांना श्रीजा आणि सुष्मिता या दोन मुली आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींना दोन मुली आहेत. तर राम चरण आणि उपासनाला लग्नाच्या १२ वर्षांनी गेल्यावर्षी कन्यारत्नाची प्राप्ती झाली. तिचं नाव क्लिन कारा असं ठेवलं आहे.