दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी आऊट झाले. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मी 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. या सिनेमातून अॅसिड हल्ल्यासारख्या भीषण घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.
या चित्रपटात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. लक्ष्मी आणि तिची पहिली भेट एक वर्षांपूर्वी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती असे दीपिकाने नुकत्याच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात दीपिका आणि लक्ष्मी या दोघांनाही आपल्या कार्यासाठी गौरवण्यात आले होते. त्यावेळी दीपिका पहिल्यांदा लक्ष्मीला भेटली होती.
'छपाक' मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. होळीच्या दिवसापासून दीपिकाने दिल्लीतून या सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका आणि मेघना गुलजार पहिल्यांदाच एकत्र काम करतायेत. मेघनाने ज्यावेळी दीपिकाला 'छपाक'ची कथा सांगितली त्यावेळी दीपिकाला अश्रू अनावर झाले होते असे मेघनाने सांगितले होते.
दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. पद्मावत या चित्रपटानंतर जवळजवळ दोन वर्षांनी दीपिकाचा चित्रपट येत असल्याने सध्या ती या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे.
या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले आहेत. दीपिकाचे फॅन्सच नव्हे तर बॉलिवूडमधील सगळेच कलाकार या चित्रपटाच्या पहिल्या लूकचे कौतुक करत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मेघना गुलजारच्या 'राझी' सिनेमाने आपली छाप पाडली. अनेक अॅवॉर्ड राझीने आपल्या नावावर केले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राझीसाठी आलिया भटला गौरविण्यात आले तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार 'राझी'साठी मेघनाला देण्यात आलाय. त्यामुळे दीपिका आणि मेघनाच्या 'छपाक' सिनेमाकडून त्यांच्या फॅन्सना बऱ्याच अपेक्षा असतील यात काही शंका नाही.