छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अत्यंत जीवलग सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर आधारीत 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा मराठी चित्रपट इतर ५ भाषांमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे. मात्र या ट्रेलर लाँचवेळी एका हिंदी पत्रकाराकडून अनावधानाने छत्रपती शिवाजी महारांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. हे ऐकताच अभिनेता शरद केळकर(Sharad Kelkar)नं पत्रकाराला चांगलेच सुनावले.
शरद केळकरछत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पत्रकाराला समजावत म्हटलं की, 'याचसाठी हा घाट घातला आहे. मी रागावलो नाहीये पण अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असेल तर त्यासाठीच हा चित्रपट केला गेला आहे. शिवाजी महाराजांसारखं दुसरं कुणीही नाही आणि कुणी होऊ शकणारदेखील नाही. त्यांच्यासारखे दुसरे आदर्श नाहीत. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे.'
यापूर्वी शरदने एका निवेदिकेला शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यापासून थांबवले होते. 'तान्हाजी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अँकरने महाराजांचा उल्लेख शिवाजी असा केला होता. त्यावेळी तो भडकला होता. त्याने तिला थांबवत तिची चूक दुरुस्त करायला सांगितली होती.
हर हर महादेव चित्रपटात शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री अमृता खानविलकर, हार्दिक जोशी, सायली संजीव, मिलिंद शिंदे, नितेश चव्हाण, निशिगंधा वाडकर यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.