रितेश देशमुख आणखी एका मराठी चित्रपटात येतोय आणि तोही चक्क शिवाजी महाराजांच्या भूमिकेत. ‘छत्रपती शिवाजी’ नावाच्या या चित्रपटाची निर्मिती रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया आणि मुंबई फिल्म कंपनी करणार आहे. रितेशने हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळविल्यावर ‘लय भारी’मधून मराठीत पदार्पण केले होते. याची निर्मितीही जेनेलियानेच केली होती. ‘छत्रपती शिवाजी’ नावाचे गारुड संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. कोणत्याही अभिनेत्यासाठी ही भूमिका म्हणजे आव्हान असते. लोकांच्या थेट मनात जाण्याची संधी त्यातून मिळते. चंद्रकांत, सूर्यकांत या अभिनेत्यांपासून ते ‘मी शिवाजीराजे बोलतोय’मध्ये महेश मांजरेकर यांनी शिवाजी महाराजांना पडद्यावर साकारले आहे. आता रितेशला शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी रसिक नक्कीच प्रचंड उत्सुक असणार आहेत. रितेशचा ‘लय भारी’चा अनुभव आणि मराठीमध्ये वेगळे काही करण्याचा त्याचा प्रयत्न पाहता हा चित्रपट भव्य असणार आहे, यात शंका नाही. शिवाजी महाराजांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी स्वत: रितेशही इच्छुक आहे. मात्र, चित्रपटातील इतर गोष्टींबाबतची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.
रितेश साकारणार ‘छत्रपती शिवाजी’
By admin | Published: August 22, 2015 12:06 AM