Join us

'श्वास घेताना त्रास होतोय'; कॅन्सरवर मात केल्यानंतर छवी मित्तलला झाला नवा आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 3:20 PM

Chhavi mittal: छातीमधील कार्टिलेजला झालेल्या जखमेुळे हा आजार झाल्याचं तिने सांगितलं आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तल (chhavi mittal) हिने काही दिवसांपूर्वीच कर्करोगासारख्या असाध्य आजारावर मात केली. गेल्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र, शस्त्रक्रिया आणि रेडिओथेरेपीनंतर तिने कॅन्सरवर मात केली. विशेष म्हणजे या संपूर्ण आजारपणाच्या काळात छवी खूप सकारात्मक होती. परंतु, कॅन्सरवर मात केल्यानंतर तिला पुन्हा एक नवा आजार झाला आहे.

छवीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला  कॉस्टोकॉन्ड्राइटिस (costocondritis) हा आजार झाल्याचं सांगितलं आहे. छातीमधील कार्टिलेजला झालेल्या जखमेुळे हा आजार होतो. कॅन्सरवरील उपाचर किंवा ऑस्टियोपेनिया वा ठराविक इंजक्शनच्या दुष्परिणामामुळे हा होऊ शकतो. तसंच सततच्या खोकल्यामुळेही हा आजार उद्भवू शकतो, असंही तिने सांगितलं.

या नव्या आजारामुळे छवीला श्वास घेताना, झोपताना, उठता-बसताना, हात हलवताना आणि हसतानाही त्रास होत आहे. तिच्या छातीमध्ये खूप वेदना होतात. परंतु, या परिस्थितीमध्ये आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे असं ती तिच्या पोस्टमध्ये म्हणते.

"मी कायमच सकारात्मक स्थितीमध्ये असते असं नाही. पण, फार क्वचित नकारात्मक होते. मला जे ठिकाण खूप जास्त आवडतं ते म्हणजे जीम. मी फार मोठ्या धाडसाने जीममध्ये गेले. कारण, जेव्हा आपण कधी खाली पडतो. तेव्हाच आपण उंच भरारी घेण्यासाठी तयार होतो. सध्या तरी मी हेच करतीये", असं म्हणत छवीने तिचा जीममधला फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, छवीची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी तिला धीर दिला आहे. छवीने आतापर्यंत ‘तीन बहुरानियाँ’, ‘तुम्हारी दृष्टी’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘बंदिनी’ आणि ‘नागिन’ या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :छावी मित्तलटेलिव्हिजनसेलिब्रिटी