तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगिरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. या अपघातात भारतीय संरक्षण दलाचे सीडीएस (CDS) बिपीन रावत (bipin rawat) यांचं निधन झालं आहे. त्यांच्यासह अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांचंही निधन झालं आहे. बिपीन रावत या हेलिकॉप्टरमधून वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. बिपीन रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून देशवासी त्यांना आदरांजली वाहत आहेत. यात अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. विशेष म्हणजे देशसेवेसाठी स्वत:ला झोकून दिलेल्या बिपीन रावत यांचा कलाविश्वाशीही जवळचा संबंध होता. त्यामुळेच देशसेवेवर आधारित 'उरी' आणि 'शेरशाह' या चित्रपटाच्या टीमला त्यांनी आवर्जुन भेट दिली होती.
जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याचं भारतीय सेनेने चोख उत्तर दिलं होतं. भारतीय लष्कराने पाकिस्तानात जात सर्जिकल स्ट्राइक केला होता. याच सर्जिकल स्ट्राइकवर आधारिक 'उरी' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बिपीन रावत यांनी त्यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं.
'उरी'च्या टीमला दिलेलं जेवणाचं आमंत्रण
लष्कर दिनानिमित्त (Army Day) बिपीन रावत यांच्या घरी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'च्या टीमला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी बिपीन रावत यांचा मान ठेवत अभिनेता विकी कौशल, यामी गौतम, दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माता रोनी स्क्रूवाला या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळचा एक फोटो केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विटवर शेअरही केला होता. "लष्कर दिनानिमित्त बिपीन रावत यांच्या घरी..चित्रपट उरी: द सर्जिकल स्ट्राइकच्या टीमसोबत", असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं होतं.
'शेरशाह'च्या ट्रेलर लॉन्चलाही लावली होती हजेरी
२२ व्या कारगिल दिनाचं औचित्य साधून 'शेरशाह' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. या लॉन्चिंगच्यावेळीही बिपीन रावत हजर होते. 'शेरशाह' हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित होता. देशसेवेवर आधारित अनेक चित्रपटांचं त्यांना कौतुक होतं आणि वेळोवेळी त्यांनी कलाकारांचं प्रोत्साहनही वाढवलं होतं.
दरम्यान, देशातील रिअल हिरोंवर आधारित चित्रपटांचं बिपीन रावत यांना कायमच कौतुक होतं. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्येही अशा चित्रपट, कलाकारांचं कौतुक केलं होतं. मात्र, त्यांच्या अचानकपणे झालेल्या निधनामुळे सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत प्रत्येकाला धक्का बसला आहे.