अभिनेते चिन्मय मांडलेकर, मंगेश देसाई, लोकेश गुप्ते देणार लवकरच एका हिंदी मालिकेमध्ये झळकणार आहेत. या मालिकेसाठी त्यांनी नुकतेच चित्रीकरण केले आहे. सोनी एंटरटेनमेंटवरील क्राईम पेट्रोल दस्तकमध्ये ते एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत ते सूत्रधार आणि मुख्य पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
गेली १५ वर्षं भारतीय टेलिव्हिजन विश्वावर अधिराज्य गाजवणारी सोनी एंटरटेनमेंट चॅनलवरील क्राईम पेट्रोल दस्तक ही मालिका आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मराठीतील आघाडीचे अभिनेते चिन्मय मांडलेकर, मंगेश देसाई, लोकेश गुप्ते यामध्ये सूत्रधार आणि पोलिसांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या आकर्षक कथांनी आणि वास्तवदर्शी चित्रीकरणाने गेली दीड दशकं रसिकांच्या मनावर गारुड करणारे क्राईम पॅट्रोल दस्तक नव्या ढंगात येणार असून नवी थीम आणि नवी टीम यासाठी सज्ज झाली आहे.
गुन्हे कधीच सांगून घडत नाहीत. सध्याचा काळ कठीण आहे आणि गुन्हे चारही बाजूंनी घडत आहेत. या काळात सतर्कता हेच आपले शस्त्र आहे. जेव्हा मनात संशय डोकावतो, तेव्हा सावध व्हा आणि त्या संशयाचा पाठपुरावा करा. गुन्हे घडण्यापासून रोखण्याचा आणि स्वत:सोबतच आपला समाज सुरक्षित ठेवण्याचा हाच एकमेव उपाय आहे. अशा या नव्या कथासूत्रात बांधलेल्या वास्तवदर्शी कथा घेऊन क्राईम पॅट्रोल दस्तक नव्याने आपल्यासमोर येत आहे. यात मुख्य भूमिकेत असणार आहेत अभिनेता चिन्मय मांडलेकर, मंगेश देसाई आणि लोकेश गुप्ते... या कथेमध्ये ते पोलीस इन्स्पेक्टर असण्यासोबतच कथेचे सूत्रधार देखील असतील. आपल्या उत्स्फूर्त आणि आकर्षक निवेदनाने ते कथेला पुढे घेऊन जातानाच त्यातील रहस्य देखील उलगडत नेतील. सूत्रधार आणि मुख्य कलाकार एकच असण्याचा हा नवा प्रयोग कथानकाला सुसूत्रता देईल.
क्राईम पेट्रोल या मालिकेचे गेल्या अनेक वर्षांपासून सूत्रसंचालन अनूप सोनी करत आहे. त्याच्या या सूत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच आवडत होता. पण त्याने काहीच महिन्यांपूर्वी हा कार्यक्रम सोडला.