ऐतिहासिक सिनेमांसाठी खासकरुन ओळख निर्माण करणारा लोकप्रिय मराठी दिग्दर्शक म्हणजे दिग्पाल लांजेकर. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ यांसारखे ऐतिहासिक सिनेमा गाजल्यानंतर त्यांचा सुभेदार हा नवा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमातून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत असून अलिकडेच त्याने एक मोठ वक्तव्य केलं आहे. जर देशाचे पंतप्रधान जरी समोर आले तरीदेखील छत्रपतींच्या वेशात असताना फोटो काढणार नाही, असं त्याने ठणकावून सांगितलं आहे. त्याचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
शिवराज अष्टक मालिकेतील सुभेदार हा पाचवा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये चिन्मय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे शिवरायांचा कुठेही अपमान होऊ नये यासाठी तो सेटवर काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करतो. याविषय़ी अलिकडेच त्याने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला.
पुण्यामध्ये सुभेदार सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी चिन्मयने मीडियाशी संवाद साधला त्यावेळी सेटवर तो कोणते नियम पाळतो हे सांगितलं. "छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना मी खूप नियम पाळतो. यात सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्यावेळी मी शिवरायांच्या पोशाखात असतो त्यावेळी मी कोणासोबतच सेल्फी घेत नाही.आणि, कधी सेल्फी काढणार सुद्धा नाही. पूर्ण पोशाख, जिरेटोपी घातलेली असताना अगदी देशाचे पंतप्रधान जरी आले तरी सुद्धा मी सेल्फी काढणार नाही. तुम्हाला माझे त्या पोशाखातील सेल्फी फोटो सुद्धा कुठे सापडणार नाहीत'', असं चिन्मय म्हणाला.
पुढे तो म्हणतो, " संपूर्ण पोशाख घातल्यानंतर, तयारी केल्यानंतर मी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असतो. त्यामुळे त्यांचा मान राखला पाहिजे. माझ्या या नियमामुळे अनेकांचा हिरमोड होतो. पण, मी माझी तळमळ त्यांना सांगतो. माझ्या भावना समजून घ्या..सेल्फी काढणं शक्य नाही, असं म्हणत मी नकार देतो. प्रत्यक्ष लोकेशनवर अनेक लोक भेटायला येतात. अशा वेळी महाराजांचा सन्मान करणं गरजेचं आहे."
दरम्यान, दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार हा सिनेमा येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये चिन्मयसह मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे ही कलाकार मंडळी झळकणार आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. तर, प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.