सोनी सबवरील मालिका 'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से' रोमांचक ट्विस्ट्ससह वागळेच्या जीवनातील दैनंदिन घटनांना सादर करत रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. छोट्या पडद्यावर 'वागले की दुनिया' मालिका प्रचंड पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेतील सगळेच पात्र रसिकांच्या आवडीचे बनले आहेत. दिवसेंदिवस मालिकेतल्या रंजक वळणामुळे सुरुवातीपासून आवडती बनली आहे. त्यामुळे अनेक नवीन कलाकारांना मालिकेत काम करण्याची ईच्छा असणारच. मालिकेत काम मिळवून देण्याचे सांगत सध्या मालिकेच्या नावाखाली अनेक कलाकारांची फसवणूक सुरु आहे.अशा टोळ्यांपासून सावध रहा असं आवाहन अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी केले आहे.
काम देण्याचे आश्वासन देत पैसे उकळणारे फ्रॉड लोकांची नावंही चिन्मयीने उघड केली आहेत. 'वागले की दुनिया' मालिकेत कलाकारांची गरज असल्याचे सांगत नवीन कलाकारांकडून पैसे उकळले जात आहे. मालिकेच्या नावाखाली कलाकारांची फसवणूक करण्यात येत आहे. डॅनी जोसेफ आणि प्रिसीला मॅम अशी या व्यक्तींची नावं असून हे दोघेही मालिकेत काम मिळवून देण्याचे आश्वासन देतात आणि त्याबदल्यात भलीमोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करायला सांगतात.
सांगली आणि इतर काही छोट्या भागात राहणा-या नवीन कलाकारांनाही फसवणूकीचा अनुभव आला आहे. अशाप्रकारे दिशाभूल करणा-या लोकांच्या जाळ्यात अडकून नये त्यामुळे चिन्मयी सुमितने सगळ्यांनाच सावधान राहण्याचे सांगितले आहे.
'वागळे की दुनिया' मालिकेत अशा प्रकारे कलाकारांची निवड केली जात नसल्याची माहिती देत कोणत्याही प्रकारच्या फसवणूकीला बळी पडू नये म्हणून चिन्मयी सुमितने सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन नवीन कलाकारांना केले आहे. सोबतच तिने या मेसेजचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.