प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो. त्या भूमिकेत शिरल्याशिवाय प्रेक्षकांपर्यंत ती भूमिका प्रभावीपर्यंत पोहोचत नाही. अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्याही बाबतीच असाच काहीसा प्रसंग घडला. स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत त्या बाबासाहेबांच्या आईची म्हणजेच भीमाई यांची भूमिका साकारत आहेत.
भीमाई हे अत्यंत प्रभावी आणि खंबीर असं व्यक्तीमत्व होतं. बाबासाहेबांच्या लहानपणीच भीमाई यांचं आजारपणात निधन झालं. सर्वात लहान लेकरु म्हणून भीवावर त्यांचा प्रचंड जीव होता. या मालिकेच्या सेटवरही काहीसं असंच चित्र होतं. आंबेडकरांच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अमृत गायकवाडने चिन्मयी आणि इतर सर्वांनाच खूप लळा लावला होता. भीमाई यांच्या निधनाच्या चित्रीकरणानंतर चिन्मयी यांनी मालिकेचाही निरोप घेतला. पण छोटा भीवा, मालिकेतल्या इतर सहकलाकारांसोबतच्या आठवणीने मात्र त्या भावूक झाल्या. या कुटुंबात यापुढे मी नसणार या जाणीवेने त्यांची पावलं जड झाली होती.
या मालिकेविषयी सांगताना चिन्मयी म्हणाल्या, ‘माझी आई औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शिक्षिका होती त्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावर बाबासाहेबांसारखं व्हायचं हे संस्कार झाले. घरात खूप पुस्तक होती त्याचप्रमाणे शाळेच्या लायब्ररीत मुक्त प्रवेश होता त्यामुळे वाचनाची गोडी लहानपणापासूनच लागली. आमच्या कुटुंबावर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा होता आणि आजही कायम आहे. या भूमिकेसाठी जेव्हा दशमी प्रोडक्शन्समधून विचारणा झाली तेव्हा मी तातडीने होकार कळवला. महामानवाच्या आईची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. अतिशय कणखर आणि स्वाभीमानी स्त्री असणाऱ्या भीमाई यांना मालिकेच्या रुपात भेटता आलं याचा आनंद आहे. या मालिकेचं कुटुंब माझ्या मनात कायम वसलेलं राहिल अशी भावना चिन्मयी यांनी व्यक्त केली.’
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये लहान वयातच आईचं छत्र गमावलेल्या भीमाच्या मनाची घालमेल पाहायला मिळणार आहे. आईच्या आठवणीने व्याकूळ भीवाच्या मनाची तगमग प्रेक्षकांच्या काळजाला नक्कीच हात घालेल. लहानग्या मुलांची होणारी परवड आणि घर सांभाळायला कुणीच नसल्यामुळे भीवाचे बाबा म्हणजेच रामजी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतात. भीवाला मात्र दुसऱ्या आईचं येणं पटत नाही. बयेची म्हणजे पहिल्या आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही या मतावर तो ठाम असतो. आईचं जाणं आणि सावत्र आईचं येणं या प्रसंगातून भीवाच्या लहानग्या मनावर कसा परिणाम होणार? याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. तेव्हा न चुकता पाहा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.