मीटू चळवळीचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असतानाच आता स्टार प्रवाहवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमातूनही स्त्रीयांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यात येणार आहे. अन्याय सहन न करता त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि अपराध्यांना धडा शिकवला पाहिजे हाच या विशेष भागांमागे उद्देश आहे. या विशेष भागांचं सूत्रसंचालन करणार आहेत अभिनेत्री चिन्मयी राघवन. चिन्मयी यांनी अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसंच स्त्रीयांवरील अत्याचारांविरोधात त्या नेहमी आपली रोखठोक भूमिका मांडत असतात. ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या निमित्ताने याच मुद्द्यांवर त्या भाष्य करणार आहेत.
या कार्यक्रमाविषयी सांगताना चिन्मयी म्हणाल्या “समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत आपण ऐकतो, व्यक्त होतो. स्त्रीयांवरील अत्याचार असो आणि त्यामुळेच सुरु झालेली मी टू चळवळ असो त्याबद्दल बोलणारे एण्टरटेन्मेण्ट इण्डस्ट्रीमध्ये तसे खुप कमी कार्यक्रम आहेत. चर्चासत्रांपर्यंत हा विषय मर्यादित रहातो. स्टार प्रवाहवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण आठवडा या विषयाला बहाल करण्यात आलाय हे खरंच कौतुकास्पद आहे. स्त्रीयांवरील अत्याचारांना वाचा फोडणारे विशेष भाग सादर करण्यासाठी एका महिला अँकरची निवड होणं हे माझ्यासाठी नाविन्यपूर्ण होतं आणि म्हणूनच हा शो करण्यासाठी मी लगेच होकार दिला. प्रत्येक व्यक्तिरेखा तुम्हाला काहीतरी नवं देत असते. या शोच्या यानिमित्ताने बऱ्याच गोष्टी मला नव्याने उलगडल्या याचा आनंद आहे.”