Join us

सुबोध भावेमुळे चिन्मय मांडलेकरला बसावं लागलं होतं घरी; 'वादळवाट'च्या वेळी घडला होता किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:00 PM

Chinmay mandalekar: त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट येत असूनही त्याला कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये काम करता येत नव्हतं.

सुबोध भावे (subodh bhave) आणि चिन्मय मांडलेकर (chinmay mandalekar) या दोन्ही कलाकारांचं नाव आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मानाने घेतलं जातं.  या दोन्ही कलाकारांनी उत्तम अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन यांच्या जोरावर कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनी बऱ्याचदा एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.  परंतु, एक काळ असा होता जेव्हा सुबोध भावेमुळे चक्क चिन्मय मांडलेकर याला घरी बसावं लागलं होतं. त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट येत असूनही त्याला कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये काम करता येत नव्हतं. अलिकडेच चिन्मयने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सुबोधमुळे त्याला सात महिने कसं कामाशिवाय रहावं लागलं हे त्याने सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच चिन्मयचा 'सुभेदार' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचं आणि त्याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वस्तरांमधून कौतुक करण्यात आलं. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सुबोध भावेसोबत असलेल्या मैत्रीवर  भाष्य केलं. इतंकच नाही तर त्याच्यामुळे मला तब्बल ७ महिने काम न मिळाल्याचंही त्याने सांगितलं.  परंतु, या सात महिन्यानंतर सुबोध आणि चिन्मय ही जोडी वादळवाट या गाजलेल्या मालिकेत झळकली होती.

"मी केवळ चित्रपट करणार हे ठरवूनच मी मुंबईत आलो होतो. मला टेलिव्हिजन करायचं नव्हतं. पण, इथे आल्यावर कळलं की, मराठी कलाकार  आधी कुठेतरी नोकरी करुन मग नाटक करायचे किंवा जुजबी सिनेमा करायचे. त्यांच्यासाठी एक नवीन उद्योग क्षेत्र जन्माला आलं होतं ते म्हणजे मालिका. मी जेव्हा एनएसडीला गेलो होतो तेव्हा मराठी मालिका क्षेत्र फारसं मोठं झालं नव्हतं. पण 'आभाळमाया' मालिका सुरु झाली होती. मी ही मालिका कधी पाहिली नव्हती. एनएसडीमधून मी परत आल्यानंतर या मालिकेचं दुसरं पर्व संपलं होतं. या मधल्या काळात खूप बदल झाला होता. मराठी कलाकार रोज सकाळी शुटिंगला जात होते. एनएसडीमधून आल्यानंतर अवघ्या चार-पाच दिवसात मला हे कळलं", असं चिन्मय म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मुंबईत आल्यावर रिअॅलिटी चेक लगेच होते. मी लगेच पलटी मारली. जे काम मिळेल ते करायचं असं ठरवलं. याच काळात वादळवाट नावाची नवीन मालिका आली होती. तेव्हा माझ्या एका मित्राने मला ऑडिशन द्यायला सांगितलं. त्यानुसार मी ते दिलं आणि माझी निवड सुद्धा झाली. त्यावेळी सुबोध भावे नावाचा एक अभिनेता आहे त्याच्यासोबत तुमचा ट्रॅक आहे असं मला सांगण्यात आलं. त्यावेळी सुबोध कोण मला माहित नव्हतं. तो त्यावेळी एकाच वेळी चार मालिका करत होता. 'वादळवाट', 'जगावेगळी', 'या गोजिरवाण्या घरात' आणि 'अवंतिका' या त्याच्या चार मालिका सुरु होत्या. सोबतच तो नाटक, सिनेमा करत होता त्यामुळे त्याच्या तारखा नव्हत्या. माझी निवड झालीये आणि हे कोण तरी सुबोध भावे आहेत, ज्यांच्याकडे तारखा नाहीयेत. त्यामुळे आपण घरी बसलोय.”

दरम्यान, चिन्मयने या आठवणीविषयी अजून माहिती दिली.  "मला अजूनही चांगलं आठवतंय ३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती आणि मला पहिला फोन आला की तुमची निवड झालीये. त्यावेळी मी खूप आनंदात होतो. पण, साधारण सप्टेंबर ते मार्च हे सात महिने मी घरीच बसून होतो. कारण सुबोध भावेकडे तारखा नव्हत्या. याच सात महिन्यांच्या काळात चिन्मयने लिखाण करण्यास सुरुवात केली. वादळवाटचे लेखक अभय परांजपे यांनी चिन्मयचं 'जोकर' हे नाटक पाहिलं. हे नाटक पाहिल्यावर त्यांनी या नाटकाचं लिखाण कोणी केलं विचारलं. त्यावर, आम्हीच इंप्रोवाइज केलंय. लिहीलं वगैरे नाहीये, असं चिन्मयने सांगितलं. त्यावर, 'तू लिहिलंय का?' मी म्हटलं, '९० टक्के मीच लिहिलंय' असं सांगितलं. त्यानंतर 'तू लेखक आहेस. लिहायला सुरुवात का करत नाही?' असं त्यांनी चिन्मयला विचारलं. त्यानंतर चिन्मयने लिखाणाला सुरुवात केली.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरसुबोध भावे सिनेमामराठी अभिनेता