गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे.दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून एका-एका क्रिकेटरच्या व्यक्तिरेखेवरुन पडदा उचलण्यात येतो आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे. संदीप पाटील '८३'च्या क्रिकेट टीमचा महत्त्वाचा भाग होते. पहिल्यांदाच वडिलांची कारकीर्द रुपेरी पडद्यावर साकारण्याची संधी एका अभिनेत्याला मिळत आहे. चिरागने आतापर्यंत जवळपास 11 मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे.
सिनेमाच्या शूटिंग आधी कलाकारांसाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये होणारे हे बूट कॅम्प जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या कॅम्पमध्ये क्रिकेटर्स सिनेमातील कलाकारांना क्रिकेट शिकवणार आहे. '८३' हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.