सगळीकडे दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की, दिवे, लाइटिंग, रांगोळी, कंदील आणि फराळ असे सर्व डोळ्यासमोर येते. हल्ली बाजारात वेगवेगळ्या डिझाईन्सचे कंदील पाहायला मिळतात. नुकतीच अभिनेत्री हेमांगी कवी कंदिल विकत घेण्यासाठी बाजारात गेली होती. तिने सोशल मीडियावर मार्केटमधला फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
हेमांगी कवीने इंस्टाग्रामवर कंदील मार्केटमधला फोटो शेअर करत लिहिले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही! मला आठवतंय दुकानात, बाजारात जाऊन ‘कंदील’ निवडायची जबाबदारी मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पासून देण्यात आली किंवा मी ती स्वतः घेतली कारण रंगांचं ज्ञान इतरांपेक्षा टीचभर जरा बरं म्हणून. पण मग तेव्हापासून ही रीतच झाली दरवर्षी वेळात वेळ काढून मी कंदील खरेदी करायला जाते म्हणजे जातेच. खूप भारी वाटतं निरनिरळ्या पद्धतीचे कंदील पाहून!
तिने पुढे लिहिले की, प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके कंदील आपल्या दारात, खिडकीत आसावा! खरंतर कंदील इकडून तिकडून सारखेच पण आपण निवडलेला कंदील हा आपल्या पुरता का होईना स्पेशलच असतो! पण मग इतक्या सर्व ऑप्शनमधून तो ‘एक’ कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या! लय कटीन! म्हणजे मी एखादी साडी पटकन निवडेन पण कंदील निवडणं पूर्णपणे वेगळा खेळ आहे भाई. कारण ही गोष्ट अशीय ना की ती घरातल्या प्रत्येकाला आवडायला हवी, आपली मनमानी करून चालत नाही! मला वाटलं म्हणून मी आणला असं करून नाही चालत. तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा विचार करून आणावा लागतो! निदान मी तरी असं करते! मज्जा असते सगळी! तुम्ही करता का असं?