बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गणेशने ऑल इंडिया फिल्म टेलिव्हिजन अॅण्ड इव्हेंट्स डान्सर्स असोसिएशन ( AIFTEDA) नावाने एक नवी असोसिएशन सुरू केल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.आता या मुद्यावर कोरिओग्राफर सरोज खान यांची प्रतिक्रिया आली आहे. गणेशने एक नवी असोसिएशन बनवल्याचा दावा सरोज यांनी केला आहे. केवळ इतकेच नाही तर गणेश आपले वजन वापरून नव्या डान्सर्सला गंडवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मुंबई मिररशी बोलताना सरोज खान यांनी हा आरोप केला. गणेश स्वत:च्या पोजिशनचा वापर करून डान्सर्सची फसवणुक करतोय आणि जुन्या असोसिएशनची प्रतीमा मलीन करतोय, असे त्या म्हणाल्या.त्या पुढे म्हणाल्या की, सीडीए या डान्स असोसिएशनची स्थापना 1955 साली झाली होती. या सीडीएने रेमो डिसूजा व अहमद खानसारखे डान्सर्स इंडस्ट्रीला दिलेत. गणेश आणि त्याचे वडीलही या असोसिएशनचे सदस्य होते. पण आता गणेश संपूर्ण इंडस्ट्रीत सीडीएला बदनाम करतोय. जुन्या संस्थेवर बहिष्कार टाकून नवी संस्था उभारणे ही फसवणूक आहे. ज्यादा पैशांचे आमीष दाखवून तो नव्या लोकांची फसवणूक करतोय. डान्स कम्युनिटीमध्ये फूट पाडतोय.
गणेश म्हणाला...मी ऑल इंडिया फिल्म टेलिव्हिजन अॅण्ड इव्हेंट्स डान्सर्स असोसिएशनच्या उद्घाटनाला हजर होतो. कारण मला त्यासाठी निमंत्रित केले गेले होते. सीडीएबद्दल बोलायचे तर मी या संस्थेत परतायला तयार आहे. पण निष्पक्ष निवडणूक आणि योग्य मोबदला या मागण्या मान्य होत असतील तरच. सीडीए सहा महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले होते. पण तीन महिन्यांपूर्वी काही लोकांनी कोर्टाचा आदेश न दाखवता पुन्हा सीडीए सुरु केले. निवडणुका न घेता सर्व पदांची भरती करण्यात आली आणि आता ते डान्सर्सवर पुन्हा सीडीएत सामील होण्याबाबत दबाव टाकत आहेत, असे गणेश म्हणाला.