Join us

मराठीत कोरिओग्राफीचा अनुभव खूपच वेगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 2:46 AM

अनेक मराठी चित्रपट आणि बॉलिवुड चित्रपटांचे कोरिओग्राफर उमेश जाधव टू मॅड - महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाचे परीक्षण

अनेक मराठी चित्रपट आणि बॉलिवुड चित्रपटांचे कोरिओग्राफर उमेश जाधव टू मॅड - महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. या कार्यक्रमाबाबत आणि त्यांच्या एकंदर कारकिर्दीबाबत त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...तुम्ही खूपच वेगवेगळ्या प्रकारचे नृत्यप्रकार तुमच्या कोरिओग्राफीमध्ये नेहमीच वापरत असता, इतके नृत्य प्रकार तुम्ही कसे आत्मसात केले?मी अहमद खान यांना बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांसाठी असिस्ट केले आहे. अहमद खान यांच्या नृत्यावर पाश्चिमात्य नृत्याचा प्रभाव आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मी नेहमीच काही ना काही तरी नवीन शिकत असतो. तुम्हाला इंडस्ट्रीत टिकून राहायचे असेल तर नवीन गोष्टी स्वीकारण्याची तुमची तयारी पाहिजे असे मला वाटते. त्याचमुळे मी नेहमी नवीन काही तरी करण्याच्या शोधात असतो. मी परदेशात जातो. त्यावेळी आवर्जुन तेथील ब्रॉडवे शोज पाहातो. यातून मला अधिकाधिक नृत्यप्रकारांविषयी माहिती मिळते.तुम्ही मराठी आणि बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीत काम करता. तुम्हाला या दोन्ही इंडस्ट्रींमध्ये काय फरक जाणवतो?मराठी इंडस्ट्रीतील वातावरणच वेगळे आहे. मराठीत काम करताना अभिनेता हा माझा मित्र असतो. चित्रीकरणाच्यावेळी तो माझ्या बाजूला बसून नृत्याविषयी चर्चा करतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना एक कम्फर्ट लेवल असते. पण बॉलिवुडमध्ये अभिनेता हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलेला असतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना खूप वेगळेपणा जाणवतो. तसेच अनेकवेळा तर त्या अभिनेत्याच्या स्टाइलनुसार गाणे कोरिओग्राफ करावे लागते. पण मराठीत कोरिओग्राफरला अनेक प्रयोग करण्याची संधी मिळते. ‘टू मॅड’ या कार्यक्रमाचे तुम्ही परीक्षण करत आहात, या कार्यक्रमाचे चित्रीकरणही सुरू झाले आहे, याचा अनुभव कसा आहे?‘टू मॅड’ या कार्यक्रमात आॅडिशनला आलेल्या लोकांचे नृत्य पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटले होते. कारण या स्पर्धकांनी आॅडिशनला वेगवेगळे नृत्यप्रकार सादर केले. हे नृत्यप्रकार त्यांना कोणीही शिकवलेलेदेखील नव्हते. केवळ त्यांनी यु ट्यूूबला पाहून ते सादर केले होते. काहींनी तर आपले नृत्यप्रकार स्वत: तयार केले आहेत. त्यामुळे या आॅडिशननंतर आपल्याकडे किती टायलेंट आहे याची मला जाणीव झाली आणि विशेष म्हणजे अमृता खानविलकर, संजय जाधव आणि माझी केमिस्ट्री खूप चांगली जुळून आली आहे. त्यामुळे आम्ही परीक्षण करणे एन्जॉय करत आहोत.तुम्ही अनेक वर्षे इंडस्ट्रीत आहात, तुम्ही अनेक चित्रपटांची कोरिओग्राफी केली आहे. आता तुम्ही भविष्यात नृत्याचे धडे देणार आहात का?मी पुढील वर्षी काही वर्कशॉप आयोजित करण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये वर्कशॉप घेऊन त्यात नृत्य शिकवायचे असे माज्या डोक्यात सुरू आहे. पण सध्या तरी मी मॅडवर लक्ष केंद्रित करत असल्याने या कार्यक्रमानंतरच याचा विचार करेन.