बंगळुरूू - साऊथ सिनेसृष्टीवर यंदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन धक्का देणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या आहेत. आता, ३९ वर्षीय अभिनेता नितीन गोपी यांचं निधन झालं आहे. बंगळुरू येथील घरी असताना अभिनेता गोपी यांना अचानक छाती दुखू लागले. त्यामुळे, त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नितीन गोपी यांनी कन्नड चित्रपट आणि टेलिव्हीजनवरील मालिकांमध्ये काम केलं आहे.
बॉलिवूडचे उत्कृष्ट दिग्दर्शक-अभिनेते आमिर रजा हुसैन यांनी अचानक एक्झिट घेत सर्वांनाच धक्का दिला. अभिनेत्याचं वयाच्या 66 व्या वर्षी निधन झालं आहे. या घटनेने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असतानाच कन्नड अभिनेता नितीन गोपी यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीजवरही शोककळा पसरली आहे. नितीन गोपी हे प्रादेशिक सिनेमा क्षेत्रातील नावाजलेलं नाव होतं. हॅलो डॅडी, केरळ केसरी, मुत्तिनंथा हेंदती, निशब्द आणि चिरबांधव्य या चित्रपटांनी त्यांना ओळख मिळवून दिली. तर, श्रुती नायडू निर्मित 'पुनर्विवाह' या लोकप्रिय मालिकेतही नितीनने महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि हा शो कर्नाटकात सुपर हिट झाला होता.
दरम्यान, गेल्याच महिन्यात तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत काम करणाऱ्या चरथ बाबू यांचे मे महिन्यात निधन झाले होते. ते सुपरस्टार रजनीकांत यांचे मित्र होते. तर, एप्रिल महिन्यात ५२ वर्षीय अभिनेता अल्लू रमेश यांचेही ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. गेल्या २ महिन्यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीने तीन मोठे अभिनेते गमावले आहेत. त्यामुळे, या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून मोठ्या कलाकाराला इंडस्ट्रीज मुकली आहे.