Join us  

चित्रपटसृष्टी म्हणजे वडिलांनी गिफ्ट दिलेला स्टुडिओ नव्हे - कंगनाचे करणवर टीकास्त्र

By admin | Published: March 09, 2017 9:46 AM

'मला इंडस्ट्री सोडायला सांगण्याचा करणाला काहीही अधिकार नाही. ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे त्याच्या वडिलांनी भेट दिलेला एखादा स्टुडिओ नाही' अशा शब्दांत कंगनाने करणला चोख प्रत्युत्तर दिले.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९ - ' चित्रपटसृष्टीत राहण्याचा त्रास होत असेल तर कंगनाने ही इंडस्ट्री सोडावी' अशा शब्दांत दिग्दर्शक करण जोहरने अभिनेत्री कंगना राणौतवर निशाणा साधला होता.  ' कॉफी विथ करण'मध्ये येऊन करणलाच घराणेशाहीबद्दल चार शब्द सुनावणा-या कंगनावर करणने  टीकास्त्र सोडले होते. त्याच्या याच आरोपांना कंगनाने चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले. ' मला इंडस्ट्री सोडायला सांगण्याचा करणाला काहीही अधिकार नाही. ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या २० वर्षी भेट दिलेला एखादा स्टुडिओ नाहीये. ही इंडस्ट्री प्रत्येक भारतीयाची आहे आणि इथे काम करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. माझ्यासारख्या बाहेरून आलेल्यांना इथे सन्मान मिळतो' असे खडे बोल कंगनाने करणला सुनावले आहेत.
 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने करणच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत त्याला घराणेशाहीचा अर्थ माहीत नसल्याचीही टीका केली. ' घराणेसाही म्हणजे फक्त तुमची मुलं, भाचरं, भावंडं यांनाच काम देणं नव्हे, पण करण त्याचा(घराणेशाहीचा) असा अर्थ लावत असेल तर मी त्याबद्दल काहीही बोलू इच्छित नाही. पण मला काम न देण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य करणे म्हणजे एखाद्या कलाकाराची खिल्ली उडवण्यासारखे आहे. आणि या वक्तव्यावरून त्याची स्मरणशक्ती कमकुवत असल्याचे दिसते, कारण आम्ही उंगली चित्रपटात एकत्र काम केले आहे, जो त्यानेच प्रोड्यूस केला होता. मात्र आमचे सूर जुळत नसल्याचे आम्हाला लवकरच लक्षात आले' असे कंगनाने म्हटले आहे.
 
(एवढाच त्रास होत असेल तर कंगनाने इंडस्ट्री सोडावी - करण जोहर)
 
तसेच मी माझ्या शोच्या माध्यमातून कंगनाला तिचं मत मांडण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला, या करणच्या वक्तव्यावरही कंगनाने आक्षेप नोंदवला.' मी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विविध दिग्गजांसह अनेक मंचांवर उपस्थित राहिले आह. त्यामुळे माझं मत मांडण्यासाठी त्याने (करण जोहर) मला मदत केली असं म्हणणं म्हणजे एक कलाकार आणि लोकप्रिय व्यक्ती म्हमून माझा अवमान करण्यासारखं आहे. आणि मला इथे आणखी एक गोष्ट नमूद करावीसी वाटते ती म्हणजे, त्याच्या शोमध्ये सहभागी व्हावे यासाठी मला निमंत्रण देण्यात आले होते. माझ्या तारखांसाठी त्याची टीम गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्या टीमच्या मागे लागली होती' असेही कंगनाने स्पष्ट केले.
दरवेळेस स्वतःचा बळी गेल्याचे दाखवण्याच्या कंगनाच्या स्वभावाची, तिच्या वुमन कार्डची आता सवय झाली आहे, असेही करणने म्हटले होते. कंगनाने त्यावरही करणला कठोर शब्दांत सुनावले आहे. ' एक स्त्री आहे म्हणून करण स्त्रीत्वाचा अपमान का करत आहे? असा सवाल तिने विचारला. हे ' वूमन कार्ड' आणि 'व्हिक्टीम कार्ड' काय असतं? हे असे शब्द वापरणे म्हणजे स्त्रियांचा अपमान करण्यासारखेच आहे. 'वूमन कार्ड' वापरून तुम्हाला विम्बल्डन चॅम्पियन बनता येत नाही की ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकता येत नाही, ना राष्ट्रीय पुरस्कार मिळवता येत नाही किंवा नोकरीही मिळत नाही ' अशा शब्दांत कंगनाने करणला प्रत्युत्तर दिले आहे. 
' मी मला जमेल ती कार्ड्स वापरते, कामाच्या, स्पर्धेच्या ठिकाणी कठोरतेचे तर कुटुंबीय, मित्रांसह प्रेमाचं कार्ड वापरते. जगाशी लढा देता आत्मसन्मानाचे कार्ड आणि बसमध्ये सीट मिळवण्यासाठी 'स्त्रीत्वा'चे कार्ड वापरते. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण लोकांशी नव्हे तर त्यांच्या मानसिकतेशी लढा देत आहोत. मी करण जोहरविरोधात नव्हे तर त्याच्या पुरूषी विचारसरणीविरुद्ध लढत आहे' असे कंगनाने नमूद केले. 
 
कंगना नेहमीच तिच्या स्पष्ट आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या स्पष्ट, पारदर्शक स्वभावामुळे आणि मनात येईल ते बोलण्याच्या वृत्तीमुळे कंगनाने आत्तापर्यंत अनेक शत्रू बनवले आहेत, मात्र असं असलं तरीही कंगनाने आपला स्वभाव बदललेला नाही. जे खरं असेल ते आणि मनात असेल तेच ती बोलते. मात्र तिचा हा बेधडक स्वभाव अनेकांना पटत नाही. कॉफी विथ करण'मध्ये कंगनाने कंगनाच्या बेधडक उत्तरांमुळे आणि आपल्यावरील आरोपांमुळे करण जोहरला मोठा धक्का बसला होता. अनुपमा चोप्रा यांच्याशी बोलताना करणने अखेर याप्रश्नी मौन सोडत कंगनावर टीका केली होती. 
 
काय म्हणाला करण जोहर?
 
कंगनाच्या (शोमधील) वक्तव्यात कोणताही बदल न करण्याइतका वा ते कट न करण्याइतकं मोठं मन माझ्याकडे आहे. तिचं मत मांडण्यासाठी मी तिला मंच उपलब्ध करून दिला आणि आता या मंचावरून मी माझं मत मांडत आहे. प्रत्येकवेळी स्वतःचा बळी गेल्याचे दाखवण्याच्या कंगनाच्या स्वभावाची आता सवय झाली आहे. या इंडस्ट्रीमुळे तिला जर एवढाच त्रास होत असेल, अडचणी येत असतील तर तिने ही इंडस्ट्री सोडावी' असे करणने म्हटले. तसेच कंगनाच्या घराणेशाहीच्या आरोपालाही त्याने सडेतोड उत्तर दिले. ' मी आत्तापर्यंत माझ्या कुटुंबातील कोणालाही चित्रपटसृष्टीत ब्रेक वगैरे दिलेला नाही. त्यामुळे माझ्यावर ' नेपोटिझम'चा आरोप करणा-या कंगनाला त्या शब्दाचा खरा अर्थ माहीत नसावा' असेही करणने म्हटले होते.. 
 
काय म्हणाली होती कंगना?
'कॉफी विथ करण'मध्ये 'रंगून'च्या प्रमोशनसाठी सैफ अली खानसोबत आलेल्या कंगनाने बेधडक उत्तरे दिली होती. रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने करण जोरवरही निशाणा साधला होता. कंगनाच्या म्हणण्यानुसार 'जेव्हा कधी तिच्या जीवनावर चित्रट बनेल वा आत्मचरित्र लिहील, त्यावेळी त्यामध्ये घराणेशाहीच्या मुद्द्याला अनुसरुन काही भाग असेल आणि तो भाग करण जोहरनेच लिहिलेला असेल' तिच्या वक्तव्याने करणही तेव्हा अवाक झाला होता.