'मुन्नाभाई एमबीबीएस' हा सिनेमा रिलीज होऊन तब्बल २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही हा सिनेमा जेव्हा पाहिला जातो तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन होतं यात शंका नाही. 'मुन्नाभाई एमबीबीएस' मधील मुन्ना आणि सर्किटच्या जोडीने प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण २१ वर्षांपुर्वी एक असा निर्णय घेण्यात आलेला त्यामुळे मुन्ना-सर्कीट जोडी आज जितकी लोकप्रिय आहे तितकी झाली नसती. काय झालं होतं नेमकं?
मैशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अर्शदने मोठा खुलासा केला. त्याच्या म्हणण्यानुसार.. 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमाचं जे प्लॅनिंग झालं होतं त्यानुसार सर्किटचं नाव 'खुजली' असं ठेवण्यात आलं होतं. त्याचं नाव ऐकून सर्वांना वाटेल की हा फक्त अंग खाजवत असणार, अजून काही करणार नाही. जर असं सिनेमात खरंच घडलं असतं, तर पुढे मुन्ना - सर्किट जी जोडी लोकप्रिय झाली, ती कदाचित झाली नसती असं अर्शदला वाटतं.
पुढे राजकुमार हिरानींनी मध्यस्थी करुन सिनेमातील 'खुजली' हे नाव बदललं. पुढे सिनेमात अनेक बदल सुचवण्यात आले. दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी अर्शदला सर्किटसाठी चाकू वापरण्याची परवानगी दिली. याशिवाय सर्किट काळे कपडे परिधान करेल, असं अर्शदने सुचवलं होतं. त्यालाही राजकुमार यांनी संमती दिली. याशिवाय ‘ऐ चिली चिकन,’ ‘चल ना छिछोरे,’ ‘खजूर,’ ‘ऐ डिस्पेंसरी क्या नाटक है बे’ आणि ‘बाल की दुकान,’ असे अनेक संवाद अर्शदने स्वतःच डेव्हलप केल्याचा खुलासा त्याने मुलाखतीत केला.