Join us

Cirkus Box Office Day 2: दोनच दिवसांत रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’चा वाजला बँड, अनेक ठिकाणी शो कॅन्सल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 3:37 PM

Cirkus Box Office Day 2 : रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ (Cirkus ) सिनेमा मोठा गाजावाजा करत रिलीज झाला. पण रिलीज होताच या सिनेमानं प्रेक्षकांची निराशा केली.

रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ (Cirkus ) सिनेमा मोठा गाजावाजा करत रिलीज झाला. पण रिलीज होताच या सिनेमानं प्रेक्षकांची निराशा केली. गेल्या दोन दिवसांतील सिनेमाच्या कमाईचे आकडे प्रचंड निराश करणारे आहेत. देशभरात 2300 स्क्रिन्सवर ‘सर्कस’ रिलीज झाला. पण या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अनेक चित्रपटगृहांत 100 पैकी केवळ 10-15 सीट भरलेल्या दिसल्या. आता तर अनेक मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकच नसल्याने ‘सर्कस’चे शो रद्द करावे लागल्याचे कळतेय. ओपनिंग डेलाच या सिनेमाचे अनेक शो रद्द केले गेल्याचं वृत्त होतं. दुसऱ्या दिवशीही देशातील अनेक भागात ‘सर्कस’चे शो रद्द झाल्याचं कळतंय.

नातळ व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ‘सर्कस’ दमदार कमाई करेल, अशी अपेक्षा होती. पण शुक्रवारी रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने केवळ 6.25 कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने केवळ 6.40 कोटींचा गल्ला जमवला. ‘सर्कस’वर 150 कोटींचा खर्च झाला आहे. अशात सिनेमा हिट होण्यासाठी 155-160 कोटींची कमाई आवश्यक आहे. पण या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद बघता हा आकडा गाठणं कठीण दिसतंय.गोलमाल फ्रेंचाइजीपासून सिंघम, सूर्यवंशी सारखे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या रोहित शेट्टीची यावेळी प्रचंड निराशा झाली आहे. महाराष्ट्रात रोहित शेट्टीचे असंख्य चाहते आहेत. पण महाराष्ट्रातच ‘सर्कस’ला प्रेक्षक मिळेनासे झाले आहेत.

अशी आहे कथा... चित्रपटाची कथा रॉय आणि जॉय हे दोन भाऊ आणि त्यांचे डुप्लिकेटस यांच्यावर आधारलेली आहे. एक रॉय हा मुंबईतील श्रीमंत तरुण बिंदूवर प्रेम करत असतो. तर दुसरा रॉय हा उटीमध्ये सर्कसमध्ये काम करणारा करंट मॅन असून, मालासोबत त्याचा विवाह झालेला आहे. श्रीमंत रॉय आणि करंट मॅन रॉय यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे. करंट मॅन जेव्हा विजेच्या तारा हातात घेतो तेव्हा श्रीमंत रॉयच्या अंगातही वीज संचारते आणि त्या वीजेचा शॉक त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला बसतो. या दोघांसोबत जॉय नावाचे दोन भाऊही आहेत. चहाची बाग खरेदी करण्यासाठी मुंबईतील रॉय जॉयसोबत उटीला जातो. दोघांची नावं सारखी असल्यामुळे मुंबईतील रॉय उटीला पोहोचल्यावर सर्व त्याला करंट मॅन रॉय समजतात. त्यानंतर जी धमाल उडते ती चित्रपटात आहे...

टॅग्स :रणवीर सिंगरोहित शेट्टीसिनेमाबॉलिवूड