सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ह्या कार्यक्रमात प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या आणि त्यांचं निवारण दाखवलं जातं. लवकरच त्यामध्ये स्वच्छ आणि हरित पर्यावरणाचं महत्व सांगितलं जाणार आहे. सध्याच्या प्रसंगानुसार मेरे साईचे कलाकार, ब्रिटिश अधिकाऱ्याच्या भेटीअगोदर आजूबाजूच्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. साई बाबांची भूमिका करणारा अबीर सुफी आणि बायजा बाची भूमिका करणारी तोरल रासपुत्र खऱ्या आयुष्यात स्वच्छतेचे भोक्ते आहेत. सेट आणि त्याच्या आजूबाजूचा भाग नेहेमी स्वच्छ आणि हिरवागार राहील ह्याकडे दोघांचं नेहेमी लक्ष असतं. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञसुद्धा कामाची जागा नेहेमी स्वच्छ राहील ह्यादृष्टीने प्रयत्न करत असतात.
अबीर सुफी म्हणाला, "कार्यक्रमामध्ये ब्रिटिश अधिकारी आल्यावर स्वच्छता मोहीम सुरु होणार आहे पण मला असं वाटतं की स्वच्छतेसाठी पाहुणे हे कारण नको ती एक सवय असली पाहिजे. माझा स्वच्छ आणि हरित पर्यावरण ठेवण्यावर विश्वास आहे आणि ते तसं ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. जर प्रत्येकाने आपापला वाटा उचलला तर आपला देश एकदम स्वच्छ होऊन जाईल."
तोरल रासपुत्र म्हणाली, "खऱ्या आयुष्यात मी स्वच्छतेवर अतिशय भर देते. मी स्वतः कुठेही कचरा करत नाही आणि दुसरं कोणी करताना बघूही शकत नाही. मेरे साईच्या सेटवर काम करताना अतिशय आनंद होतो कारण इथला सेट अतिशय व्यवस्थित असतो. आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला की तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकता. मी नेहेमीच ह्या गोष्टीचा प्रसार करते आणि मला आनंद वाटतो की आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आम्ही अनेक लोकांपर्यंत हा संदेश पोचवून अशा कामांसाठी पाठपुरावा करू शकू."