Vijay Chavan Death: विजय चव्हाण यांच्या निधनामुळे जवळचा मित्र गमावला - अशोक सराफ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 10:03 AM2018-08-24T10:03:10+5:302018-08-24T10:09:46+5:30
Vijay Chavan Death: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली.
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचे मोठं नुकसान झाले आहे.
''विजय चव्हाण यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये खरोखरच एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भूमिका कोणतेही असो त्यात ते अतिशय चपखलपणे बसायचे. त्यांची अभिनयाची वेगळी अशी शैली होती. मोरूची मावशी' नाटकातील मावशीच्या भूमिका त्यांनी अजरामर केली. विजय चव्हाण यांच्या जाण्याने माझे वैयक्तित नुकसान झाले आहे कारण ते माझे जवळचे मित्र होते अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते.
विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले.