Join us

मुंबईतील खड्ड्यांबाबत मनिष पॉलचा प्रश्न, CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले- "३५०० कोटी खर्च करूनही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 1:33 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनिष पॉलच्या 'द मनिष पॉल पॉडकास्ट'मध्ये हजेरी लावली होती.

प्रसिद्ध कॉमेडियन मनिष पॉल सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शिंदेंच्या गाडीचं स्टेअरिंग मनिष पॉलच्या हातात दिसलं होतं. या व्हिडिओमुळे मनिष पॉलच्या राजकीय एन्ट्रीची सर्वत्र चर्चा रंगली होती. एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने या चर्चांना उधाण आलं होतं. पण, आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे. 

मनिष पॉलने 'द मनिष पॉल पॉडकास्ट' हे त्याचं पॉडकास्ट सुरू केलं आहे. या पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. या पॉडकास्टचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये मनिष पॉल शिंदेंना मुंबईतील खड्ड्यांबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. "मी अंधेरी वेस्टला राहतो. रस्त्यात इतके खड्डे आहेत. मुंबई एवढं सुंदर शहर आहे. पण, हे खड्डे कधी भरणार?" असा प्रश्न मनिष पॉलने मुख्यमंत्र्यांना विचारला. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, "आधी मी मुख्यमंत्री नव्हतो. तेव्हा मुंबई महापालिकेचं काम कोण बघायचं, हे तुम्हाला माहीतच आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कमिशनरशी बोललो. प्रत्येक पावसाळ्यात लोकांना खड्ड्यांच्या समस्येचा सामना करावा लागतो. गेल्या १०-१५ वर्षात मुंबईतील खड्ड्यांवर ३५०० कोटी खर्च करण्यात आले आहेत." 

शिंदेंच्या या विधानानंतर "३५०० कोटी खर्च होऊनही रस्ते बनत नाहीत", असं म्हणत मनिष पॉलने आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर शिंदेंनी पुढच्या दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करण्याचं आश्वासन मनिष पॉलच्या पॉडकास्टमध्ये दिलं. "तेच सांगतोय दाल मे काला था...ब्लॅक मनी-व्हाइट मनी या गोष्टी सुरू होत्या. आता मी त्यांचा धंदा बंद केला आहे. आता ७००-८०० किमीचे सिमेंटते रस्ते दिसतील. लोकांना सुविधा मिळायला हव्यात. आणि मी त्यासाठीच काम करत आहे. पुढच्या २ वर्षांत मुंबई खड्डे मुक्त करणार," असं ते म्हणाले. 

टॅग्स :मनीष पॉलएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना