Join us

योगायोगांची कल्पनारम्यता !

By admin | Published: May 22, 2015 10:50 PM

स्पर्शज्ञान हे मानवाला मिळालेले वरदान आहे, परंतु एखाद्यावेळी हेच वरदान शापही ठरू शकते. निदान ‘अगं बाई अरेच्चा २’ या चित्रपटातल्या नायिकेच्या बाबतीत तरी ते खरे ठरले आहे.

स्पर्शज्ञान हे मानवाला मिळालेले वरदान आहे, परंतु एखाद्यावेळी हेच वरदान शापही ठरू शकते. निदान ‘अगं बाई अरेच्चा २’ या चित्रपटातल्या नायिकेच्या बाबतीत तरी ते खरे ठरले आहे. आता ही नक्की भानगड काय आहे, याची उत्सुकता ताणली जाते. अर्थात केदार शिंदेच्या चित्रपटात काहीतरी अचाट असणारच याचा अंदाज असतोच. या चित्रपटातही हा अंदाज केदारने चुकवलेला नाही; फक्त यातली कल्पनेची भरारी जरा अधिक ताणली गेली आहे. शाप, योगायोग, कल्पना यांचा चमत्कारिक मेळ घालत हा चित्रपट कल्पनेचा खेळ रंगवतो. शुभांगी ही लग्नाचे वय उलटून गेलेली युवती आणि तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांची ही कथा आहे. पण ही कथा एवढ्यावरच थांबत नाही; तर तिचा गाभा आहे तो म्हणजे स्पर्श! शुभांगीच्या बाबतीतल्या या स्पर्शाच्या संवेदनेचा परिणाम थेट तिच्या संपर्कात येणाऱ्या पुरुषांवर होतो. म्हणजे तिच्या स्पशार्मुळे तिच्या जीवनात एन्ट्री करणाऱ्या आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या पुरुषांना अपघातांना सामोरे जावे लागते. बालपणीचा तिचा अवखळ मित्र प्रल्हाद, कॉलेजातला क्रिकेटपटू मित्र राहुल, लग्नासाठी स्थळ म्हणून चालून आलेला आणि किडे बाळगण्याचा छंद असलेला नरेंद्र यांच्या बाबतीत अशा अपघातांची साखळी निर्माण झाल्याने शुभांगीने धसका घेतलेला असतो. तिचे हे सुरस आणि चमत्कारिक आयुष्य पाहून विक्रम हा लेखक तिच्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्याचे ठरवतो. हे करता करता तोही तिच्या प्रेमात पडतो; पण पूर्वानुभव गाठीशी असलेल्या शुभांगीच्या मनाने घेतलेला धसका तिला विचारप्रवृत्त करीत राहतो. तिची स्पर्शाची संवेदना हा तिच्या मनाचा खेळ असतो की यात अजून काही लपलेले असते, याचे कोडे उलगडत हा चित्रपट पुढे रंगत जातो.हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे सूतोवाच करण्यात आले असले, तरी तो त्या चित्रपटाचा पुढचा भाग निश्चितच नाही. कारण ‘अगं बाई अरेच्चा २’ या चित्रपटाची कथा स्वतंत्र आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेला आहे आणि त्यात त्यांनी त्यांच्या स्टाईलने केलेल्या विविध प्रसंगांच्या पेरणीने तो चांगला रंगला आहे. मात्र चित्रपटाच्या उत्तरार्धाचे लेखन करणाऱ्या केदार शिंदेचे पाऊल जरासे अडखळले आहे. ओमकार मंगेश दत्त याने पटकथेवर अजून थोडे काम करायला हवे होते. केदार शिंदेने चित्रपटाच्या दिग्दर्शनातून केलेली कामगिरी उठावदार आहे आणि कथेच्या अनुषंगाने कलावंतांची त्याने बांधलेली मोट चित्रपट बांधून ठेवते. चित्रपटाला फ्रेश लूक देण्यात केदारने बाजी मारली आहे. सोनाली कुलकर्णीने हा चित्रपट पूर्णत: तिच्या एकटीच्या खांद्यावर वाहून नेला आहे. चित्रपटातल्या व्यक्तिरेखांप्रमाणेच कुणीही प्रेमात पडावे, अशी कामगिरी तिने बजावली आहे. फक्त काही वेळेस तिचा अभिनय लाऊड झाला आहे, तेवढे मात्र टाळायला हवे होते. विक्रमच्या भूमिकेत धर्मेंद्र्र गोहील याने दाखवलेली चमक आश्चर्यकारक आहे. सोनालीसमोर तो आत्मविश्वासाने वावरला आहे. मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, शिवराज वायचळ, माधव देवचक्के, भरत जाधव, प्रसाद ओक, सुरभी हांडे, विद्या पटवर्धन आदी कलावंत त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्या छोट्या भूमिकांमध्येही भाव खाऊन जातात. सिद्धार्थ जाधवच्या आयटम सॉँगची फोडणी चित्रपटाला आहे. निषाद या तरुण संगीतकाराने चित्रपटात दिलेली गाणी ओठांवर रेंगाळतात आणि ठेका धरायला लावतात. सुरेश देशमाने यांचा कॅमेरा मस्त फिरला आहे, तर महेश कुडाळकर यांचे कलादिग्दर्शन लक्षवेधी आहे.