म्हापसा : म्हापसा येथील युवा दिग्दर्शक यश सावंत याचा पहिलाच कोकणी भाषेतील लघुपट ‘अ कोल्ड समर नाईट’ स्विझर्लंड येथे ७१ व्या लोकार्नो आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी निवडण्यात आलेला आहे.
१९८६ सालापासून सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव जागतिक स्तरावरील दुस-या क्रमांकाचा सर्वात जुना महोत्सव असल्याची माहिती यश सावंत यांनी दिली. दहा वर्षानंतर प्रथमच भारतीय चित्रपट या महोत्सवात प्रदर्शीत केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. लिडर्स आॅफ टुमारो या विभागात हा चित्रपट २ आॅगस्ट रोजी दाखवला जाणार आहे. जागतिक स्तरावरील एकूण ४० लघुपटांचा समावेश यात करण्यात आल्याची माहिती यश सावंत यांनी दिली.
सत्यघटनेवर आधारित असलेल्या या २१ मिनिटांच्या लघुपटात आपण ज्येष्ठ व स्थलांतरिता सोबत कशा पद्धतीने वागतो, त्यांना कशी कशी वागणूक देतो याचे वास्तव या लघुपटातून चित्रीत केल्याची माहिती त्यांनी दिली. कला शाखेचा विद्यार्थी असलेल्या यश सावंत यांनी या लघुपटाचे चित्रिकरण तीन रात्रीत करून संपविले. यातील प्रमुखकलाकार गोव्यातीलच असून केतन जाधव, राजीव हेदे व गौरी कामत यात प्रमुख भूमिका करीत असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते अरविन वाझ यांनी दिली. लोकार्नो आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ही नवनिर्मात्यांसाठी व इतर दिग्दर्शकांसाठी एक मोठी बाजारपेठ असून जागतिक स्तरावरील चित्रपट वितरक मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होतात. आपला हा चित्रपट त्यांच्यासाठी नक्कीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे वाझ यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर इतर विविध महोत्सवात आपण हा चित्रपट नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यश सावंत यांनी सांगितले. तसेच गोव्यातही होणा-या इफ्फीत सुद्धा दाखवण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. आपण आणखीन विविध कथावर काम करीत असलो तरी सध्या या महोत्सवावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे यश सावंत यांनी सांगितले.