अबोली कुलकर्णी
कलाकाराला कुठलेही बंधन नसते. त्याला जी भूमिका मिळेल ती त्याला साकारावीच लागते. प्रत्येक भूमिकेला आपला एक वेगळा रंग असतो. विविध माध्यमांत काम करत असताना तुमच्या वाट्याला ज्या काही भूमिका येतात त्यात आपली वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न कलाकाराला करावा लागतो. छोटया पडद्यावरील अभिनेता शाहिर शेख हा स्टार प्लस वाहिनीवरील ‘यह रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेत अबीर राजवंशीच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्याशी या संदर्भात आणि आत्तापर्यंतच्या एकंदरितच प्रवासाविषयी त्याच्याशी गप्पा मारल्या.
* ‘यह रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेत तू अबीर राजवंशीच्या भूमिकेत दिसत आहेस. कशी आहे अबीरची भूमिका? भूमिकेसाठी कोणती तयारी करावी लागली?- होय, मी या मालिकेत अबीर राजवंशी ही भूमिका साकारत आहे. अबीर हा स्वतंत्र विचारांचा आहे. आनंदी राहायला त्याला आवडते. त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनाही तो खुश ठेवतो. हॅप्पी गो लकी असा त्याचा स्वभाव आहे. खरंतर कथेला सुरूवात तिथून होते जेव्हा त्याला कळतं की, तो प्रेमात पडला आहे. त्याशिवाय अबीरची भूमिका ही खूपच वास्तववादी असल्याने जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. जी कथेची मागणी आहे ती पूर्ण करू शकतो आहे.
* मालिकेत मिष्टी आणि कुणाल यांना तू जवळ घेऊन येऊ इच्छितोस. काय सांगशील सध्याच्या ट्रॅकविषयी?- अबीर हा असा मुलगा आहे जो स्वत:च्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करतो. त्याचा लहान भाऊ कुणालचे मिष्टीवर प्रेम जडलेले असते हे जेव्हा त्याला कळते तेव्हा तो त्यांना एक त्र आणण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र, दुसरी बाजू अशीही आहे की, मिष्टी ही कुणालशी लग्न करण्यापूर्वी त्याच्याबरोबर काही काळ व्यतीत करण्याचा निर्णय आपल्या कुटुंबियांकडे व्यक्त करते. ‘टीव्ही मालिकांमध्ये आजवर अनेक विषय सादर झाले असले, तरी लग्नापूर्वीच्या काळात एकत्र राहण्याच्या विषयाला आजवर कोणी स्पर्श केलेला नाही. खरंतर लग्न हा मुलीसाठी एकतर्फी विषय नसतो आणि लग्नापूर्वी एकमेकांना जाणून घेताना पसंत न पडल्यास कोणीही लग्नाला नकार देऊ शकतं. मिष्टी आणि कुणाल यांच्या लग्नाचं प्रकरण कसं पुढे सरकेल, त्यावर दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्तींची मतं काय असतील आणि या दरम्यान काही अनपेक्षित गौप्यस्फोट कसे होतील, तेही प्रेक्षकांना पाहायला मिळेल.’
* आत्तापर्यंत तू बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहेस. परंतु, अबीरची व्यक्तीरेखा तुझ्यासाठी किती वेगळी आहे? - नक्कीच. मी आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक भूमिका या नवीन आहेत. अबीरची जी व्यक्तीरेखा आहे तशी मी अद्याप यापूर्वी केली नव्हती. त्याची व्यक्तिरेखा माझ्यासाठी एक नवे आव्हान घेऊन आली होती. मला जेव्हा मालिकेची ऑफर मिळाली तेव्हा या भूमिकेतून काहीतरी नवीन शिकायला मिळेल असा विश्वास मला वाटत होता.
* अबीर आणि शाहिर मध्ये कोणते साम्य आहे?- सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात पैसा व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. पण, त्यासोबतच व्यक्तीने स्वत:चे आयुष्य देखील जगले पाहिजे. कारण हेच आयुष्य पुन्हा पुन्हा वाटयाला येत नाही. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने, समाधानाने जगण्याचा विचार करतो. अबीरचेही तसेच आहे. त्यालाही आयुष्य आनंदी, समाधानी, हसतेखेळते असेच हवे आहे.
* तू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेस. कसे वाटते जेव्हा चाहत्यांकडून एवढे प्रेम मिळते? - खरंच खूप छान वाटतं. कारण आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी आहे, हा विचारच खूप आनंददायी आहे. मी सोशल मीडियावर जेव्हा चाहत्यांचे माझ्यावरचे प्रेम पाहतो तेव्हा मला नवी प्रेरणा, उमेद मिळते. नव्या भूमिका, आव्हाने स्विकारण्याची हिंमत येते.